तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:58 PM2019-09-28T16:58:04+5:302019-09-28T16:58:30+5:30
महिला पोलीस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरण
भंडारा : तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार वाघमारे यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तुमसर येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
तुमसर येथे बांधकाम कामगार किट वितरणप्रसंगी आमदार चरण वाघमारे व भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक आला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सदर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगासह विविध गुन्हे १८ सप्टेंबर रोजी तुमसर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आमदार वाघमारे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात धडकले होते. याप्रकरणाची चौकशी करून मला अटक करा अशी मागणी केली होती. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी पाच दिवसाचा अवधी मागून घेतला होता.
दरम्यान शनिवारी सकाळी या प्रकरणाच्या तपास अधिकारी तथा पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रवींद्र मानकर यांच्यासह पोलिसांचे पथक आमदार वाघमारे यांच्या खात रोडवरील निवासस्थानी धडकले. त्यांना ताब्यात घेऊन भंडारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करुन दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुमसर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान तुमसर भाजप शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे यांना तुमसर पोलिसांनी अटक केली.
आमदार चरण वाघमारे यांना अटक झाल्यानंतर भंडारा पोलीस ठाणे आणि तुमसर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.
जामीन घेण्यास नकार
आमदार चरण वाघमारे यांना अटक केल्यानंतर तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्यापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यावेळी समर्थकांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार वाघमारे यांनी त्यांना थांबवित जमीन घेण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी आमदार चरण वाघमारे यांची रवानगी भंडारा कारागृहात केली.