अन् ठाणेदाराने युवकांच्या कवायतीसाठी बनविले मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:09+5:302021-01-24T04:17:09+5:30
तुमसर:- तालुक्यातील गोबरवाही परिसरातील युवकांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र झाले. मात्र शारीरिक कवायतीसाठी जागा नव्हती. त्यासाठीही गोबरवाहीचे ठाणेदार ...
तुमसर:- तालुक्यातील गोबरवाही परिसरातील युवकांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र झाले. मात्र शारीरिक कवायतीसाठी जागा नव्हती. त्यासाठीही गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यांनी पुढाकार घेत नाकडोंगरी ते आष्टी रोडवर मैदान बनवले आहे. या मैदानामुळे गोबरवाही पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरातील युवकांना पोलीस भर्तीचे प्रशिक्षण देणे सोपे झाले. ग्रामीण युवकांच्या पोलीस भर्तीचा मार्ग सुकर होणार आहे .
महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील गोबरवाही परिसर हा आदिवासी बहुल भाग. रोजगाराचा अभाव, उद्योगांची वानवा. असल्याने मागासलेपणाचा शिक्का या भागाला लागला. ही ओळख बदलण्यासाठी गोबरवाही येथे नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांनी पुढाकार घेतला. परिसरातील युवांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. परिसरातील युवांकडून स्पर्धेच्या जगात टिकाव धरण्यासाठी आवश्यक सर्व तयारी या केंद्राच्या माध्यमातून करून घेतली जात आहे. हुशार पोरं घडविण्यासाठी एक सकारात्मक प्रयत्न ध्येयवेडा ठाणेदार दीपक पाटील यांच्या माध्यमातून केला जात आहे.
गोबरवाही पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांना भेट देऊन गावातील युवकांना भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पोलीस भरतीसाठी त्यांना प्रोत्साहित केले. शारीरिकदृष्ट्या अतिशय सक्षम असल्याने पाटील यांनी ही भरती त्यांना सोपी जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परीक्षा केंद्रात दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्राला युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मात्र शारीरिक कवायतीसाठी मैदान उपलब्ध नव्हते. शारीरिक प्रशिक्षण देणे आता सोपे झाले असून युवकांचा पोलीसभर्तीचा मार्ग सुकर झाला आहे.