‘त्या’ गावगुंड मोदीचा दिवसभरात थांगपत्ता नाही; व्हिडीओतील कार्यकर्त्यांचे घेतले बयाण नोंदवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 07:51 PM2022-01-18T19:51:07+5:302022-01-18T19:51:31+5:30
Bhandara News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्हायरल व्हिडीओनंतर दावा केलेल्या गावगुंड मोदीचा दिवसभरात जिल्ह्यात कुठेही थांगपत्ता लागला नाही. मात्र व्हिडीओत दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचे बयाण मंगळवारी पालांदूर ठाण्यात नोंदवून घेण्यात आले.
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्हायरल व्हिडीओनंतर दावा केलेल्या गावगुंड मोदीचा दिवसभरात जिल्ह्यात कुठेही थांगपत्ता लागला नाही. मात्र व्हिडीओत दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचे बयाण मंगळवारी लाखनी तालुक्यातील पालांदूर ठाण्यात नोंदवून घेण्यात आले. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देवू शकतो’, असा व्हिडीओ सोमवारी सर्वत्र व्हायरल झाला. या खळबळजनक वक्तव्यांचे राज्यभर पडसाद उमटले. त्याचवेळी नाना पटोले यांनी मी पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर आमच्याकडील गावगुंड मोदींबद्दल बोललो, असा खुलासा केला. त्यानंतर जिल्ह्यात असा गावगुंड मोदी कुठे आहे, याचा शोध सुरू झाला. परंतु मंगळवारी दिवसभरातही कुठे गावगुंड मोदीचा थांगपत्ता लागला नाही. परंतु लाखनी तालुक्यातील गोंदी येथील उमेश नामक तरुण आपल्या नावापुढे मोदी लिहितो, अशी माहिती मिळाली. त्याचा १० जानेवारी रोजी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांसोबत वाद झाला होता आणि हाच वाद कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सांगत होते. तोच व्हिडीओ व्हायरल झाला. जेवनाळा येथे हा प्रकार घडला. या व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणांचे मंगळवारी दिवसभर पालांदूर पोलीस ठाण्यात बयान नोंदवून घेण्यात आले. तसेच पोलिसांचे एक पथक गोंदी येथेही एक जावून आले. मात्र तेथे नेमके काय झाले हे कळू शकले नाही.
पाेलीस अधीक्षक म्हणतात...
याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव म्हणाले, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील कार्यकर्त्यांचे बयान नाेंदविण्यात येत आहे. संपूर्ण चौकशीनंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.