गोसेखुर्दचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 02:41 PM2022-07-09T14:41:05+5:302022-07-09T14:52:21+5:30
पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवनी (भंडारा) : मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात व गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात बरसलेल्या पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी दुपारपासून प्रकल्पाचे १५ वक्राकार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पाची सद्यस्थितीत पाणीपातळी २४२.७२० मीटर आहे. पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. उजवा व डावा कालवा यामधून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे गुरुवारी प्रकल्पाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडून १०३६.८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात केला जात आहे.
प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.