अन् संतप्त तक्रारकर्त्यांनी दारावरच चिकटवले तक्रारपत्र !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:57 PM2024-05-17T13:57:36+5:302024-05-17T13:58:06+5:30
लाखांदूर बसस्थानकातील प्रकार : दिला आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : लाखांदूर बसस्थानकावरील समस्या दूर करण्यासंदर्भात सतत तीन दिवस स्थानकप्रमुखांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. मात्र, स्थानकप्रमुख कार्यालयात उपस्थित मिळत नसल्याने संतापलेल्या तक्रारकर्त्यांनी बुधवारी त्यांच्या कार्यालयाच्या दारावरच तक्रारपत्र चिकटवून परिवहन महामंडळाच्या लालफीतशाहीविरुद्ध रोष व्यक्त केला.
लाखांदूर येथे नियमित ये-जा करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांना येथील बसस्थानक प्रमुखांच्या चुकीच्या व नियोजनशून्य कारभारामुळे त्रास सहन करावा लागत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन बसस्थानकावरील समस्या दूर करण्यासंदर्भात युवक काँग्रेसच्या वतीने लाखांदूर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष शहारे यांनी लाखांदूर बसस्थानक प्रमुखांना निवेदन देण्यासाठी सतत तीन दिवस त्यांच्या कार्यालयाच्या हेलपाट्या घातल्या. मात्र, बसस्थानक प्रमुख कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने संतापलेल्या शहारे यांनी कार्यालयाच्या दारावरच तक्रारपत्र चिकटवले.
या पत्रातून त्यांनी आंदोलनाचा इशारासुद्धा दिला आहे. बसस्थानक व्यवस्थापकांना सायंकाळी घरी जायची घाई असल्याने वेळेअगोदरच कर्तव्याला पाठ दाखवत सव्वापाच वाजताची लाखांदूर-पवनी बस पाच वाजता सोडून मोकळे होतात. याव्यतिरिक्त इतरही वेळेतील बसगाड्या वेळेत न सोडता कधी वेळेआधी तर कधी वेळेनंतर सोडल्या जात असल्याचे प्रवासी सांगतात. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयींकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे, प्रवाशांच्या सोयीसाठी सदर बसस्थानकातर्फे वेळेत बस सोडण्यात याव्यात, अशा आशयाचे पत्र लाखांदूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष शहारे यांनी लाखांदूर बसस्थानक व्यवस्थापक कार्यालयाच्या दारावर चिकटवले आहे.