सानगडीच्या वैभवाची साक्ष देते किल्यावरील अजस्त्र ताेफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 04:12 PM2022-04-19T16:12:53+5:302022-04-19T16:16:35+5:30
आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था हाेत आहे.
संजय साठवणे
साकाेली (भंडारा) : भोसलेकालीन सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यावर असलेली अजस्त्र तोफ गतवैभवाची साक्ष देते. शेकडाे वर्षांपासून ऊन, पावसाचा मारा झेलत आजही ही बुलंद तोफ किल्ल्यावर कायम आहे. मात्र, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तोफेची पुरातत्व विभागाकडे साधी नाेंदही नाही. दुसरीकडे प्रशासनानेही सुरक्षा व दुरुस्तीकडे पाठ फिरविली आहे.
साकाेली तालुक्यात भोसलेकालीन सहानगड म्हणजे आजचे ऐतिहासिक वारसा सांगणारे सानगडी गाव. सुमारे अडीच हेक्टर क्षेत्रात असलेला प्राचीन किल्ला, बाहुडी, प्रवेशद्वार यासह इतिहासाच्या साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू या परिसरात विखुरलेल्या आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याची मात्र आता दुरवस्था हाेत आहे.
सानगडीच्या किल्ल्यावर अष्टधातूंची माेठी तोफ आहे. या तोफेची लांबी ११ फूट, घेर पाच फूट आणि पाच कडे आहेत. या तोफेच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. शत्रूंवर तोफेने मारा करताना टाकीतील पाण्यात बसले जायचे, त्यामुळे बहिरेपणा येत नव्हता. तत्कालीन भाेसले राजांनी सुद्धा या तोफेला बैलजोडी आणि हत्ती आणून हलविण्याचा प्रयत्न केला. परंतु ताे असफल ठरला त्यानंतर मात्र कुणीही या तोफेला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला नाही.
तोफेपुढे बोलला जाताे नवस !
तोफेला परिसरातील नागरिक तोफमाय म्हणून संबोधतात. इंग्रजांनी या तोफेला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. आजही जुने जाणते लाेक सांगतात की, दैवी शक्तीमुळे तोफ जागेची हालत सुद्धा नाही. त्यामुळेच दैवी शक्ती असल्याचा दावा करून या तोफेपुढे नवस बोलल्या जाते.
स्वातंत्र चळवळीत सहभाग
सानगडी स्वतांत्र्यापूर्वी वीर पुरुषांची कर्मभूमी हाेती. पूर्वी येथे जगन्नाथ गोलीवार यांच्या नेतृत्वात प्रभात फेरी निघायची, करेंगे या मरेंगे या आंदाेलनात त्यांच्या मागे पाेलीस लागल्याने ते भूमिगत झाले. भारत छोडो आंदाेलनात सोमा काशीनाथ बोकडे यांच्यासह ३१ लाेकांना कारागृहात पाठविण्यात आले हाेते.
साकाेली परिसरातील सानगडी येथे भोसलेकालीन किल्ला आहे. स्थानिक कारभार पाहण्यासाठी सानगडी येथे किल्ला बांधण्यात आला हाेता. परंतु आता किल्ल्याची पडझड झाली आहे. पुरातत्व विभाग व शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंचधातूंची तोफ हाेय. ही तोफ पुजे-अर्चेपुरती मर्यादित झाली आहे.
-प्रा. डाॅ. किशाेर नागपुरे, इतिहास विभाग प्रमुख, एम. बी. पटेल महाविद्यालय साकाेली.