अखेर 'त्या' मृतदेहाची तीन दिवसानंतर ओळख पटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 05:24 PM2022-04-23T17:24:47+5:302022-04-23T17:27:02+5:30
नेमके एका ठिकाणी त्याने आजपर्यंत काम केलेले नसल्याचे समजले आहे. त्यामुळे परिवारातील सदस्यांना त्याची काम करण्याचे नेमके ठिकाण माहीत नव्हते.
पालांदूर (भंडारा) : रोजगाराच्या निमित्ताने सुमारे २० वर्षापासून घराबाहेर राहणाऱ्या एका तरुण ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १६ एप्रिल ला यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयात घडली. मात्र ग्रामीण रुग्णालयात त्याची ओळख न पटल्याने मृतदेहाची शवविच्छेदना नंतर अंत्यविधी करण्यात आली. प्रकाश बुधाजी खंडाईत (३५, रा. पालांदूर, ता. लाखनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रकाश हा बऱ्याच वर्षापासून ट्रक चालक म्हणून काम करीत होता. घराबाहेर पडलेला प्रकाश वर्षातून काही वेळा राहत्या गावी पालांदूरला येत असे. परिवारातील सदस्यांशी, मित्रमंडळीशी भेट झाली की, पून्हा तो कामाच्या शोधात जात असे. नेमके एका ठिकाणी त्याने आजपर्यंत काम केलेले नसल्याचे समजले आहे. त्यामुळे परिवारातील सदस्यांना त्याची काम करण्याचे नेमके ठिकाण माहीत नव्हते.
मृत्यूच्या काही दिवसापूर्वी वणी परिसरात सिमेंटच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. अचानक प्रकाशची प्रकृती बिघडल्याने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात त्याने चिट्ठी काढून उपचार घेतले. त्यावेळेस त्याच्या सोबत कोणीच नव्हते.उपचारानंतर रुग्णालयातील परिसरातच तो चक्कर येऊन पडला. काही वेळ तो तिथेच पडून राहिला. शेजारपाजारचे यांनी त्याला उचलून पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ग्रामीण रुग्णालयातील नाव नोंदणीच्या वेळी प्रकाश बुधाजी खंडारे राहणार वणी असे नाव नोंद करण्यात आल्याने मृत्युनंतर त्याचा शोध घेण्याकरिता वणी पोलिसांना व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना यश आले नाही. तीन दिवसानंतर शव विच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर प्रकाशचे भाऊ कैलाश खंडाईत पालांदूर हे दवाखान्यात पोहोचले. मात्र तोपर्यंत सर्व प्रक्रिया आटोपलेली होती.
प्रकाशच्या मृत्यूची बातमी पालांदूर येथे पोहोचताच उलटसुलट चर्चांना पेव फुटला. ट्रक चालक असल्याने आपसातील भांडणामुळे किंवा त्याच्याकडे रोख रकमेमुळे घातपात घडवून आणला असावा असा कयास बांधला जात होता. मात्र प्रकाश चा भाऊ कैलाश यांनी स्वतः वणी येथे रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून शवविच्छेदन अहवालानुसार हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले.