जिल्ह्यातील 363 ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 09:20 PM2022-11-09T21:20:54+5:302022-11-09T21:22:13+5:30
जिल्ह्यात आता १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय क्षेत्र चांगलेच तापणार आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने गावागावात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीत गावातील राजकारणही चांगलेच ढवळून निघेल, यात काही शंका नाही. दरम्यान चातकासारखी निवडणूक घोषणेची वाट बघणारे हवसे- नवसेही आता कामाला भिडणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऑक्टोबरच्या मध्यात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींपैकी ३६३ ग्रामपंचायतींतील सदस्य व सरपंच पदासाठी १८ डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीचा आजपासून बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतची अधिसूचना जाहीर करताच जिल्ह्यात (शहरी भाग वगळता) आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण केलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
जिल्ह्यात आता १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय क्षेत्र चांगलेच तापणार आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने गावागावात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीत गावातील राजकारणही चांगलेच ढवळून निघेल, यात काही शंका नाही. दरम्यान चातकासारखी निवडणूक घोषणेची वाट बघणारे हवसे- नवसेही आता कामाला भिडणार आहेत. निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सोबतच या ग्रामपंचायतीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रशासक नियुकत करण्यात आले आहे. दरम्यान गावातील टपऱ्यांवर फक्त निवडणुकीचीच चर्चा ऐकायला मिळणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
- ताज्या निवडणूक वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना संबंधित भागातील तहसीलदारांकडून १८ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. १८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भंडारा जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, शहरी भागात याची अंमलबजावणी होणार नाही.
- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा
तुमसर तालुक्यातील सर्वाधिक ७७ ग्रामपंचायती
- ३६३ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ७७ ग्रामपंचायती तुमसर तालुक्यातील आहेत. तसेच भंडारा तालुक्यातील ३९, लाखनी व लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी ५१, मोहाडी ५८, पवनी ४६ तर साकोली तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.