निर्माणाधिन पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन चुलबंद नदीपात्रात अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:14 PM2023-06-28T18:14:34+5:302023-06-28T18:16:30+5:30
तालुक्यात पुरेशा प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वत्र ओढे व नाल्यातून पाणी वाहत असतानाच चुलबंद नदीच्या पाण्यातदेखील अचानक वाढ झाली आहे.
लाखांदूर (भंडारा) : गत सहा महिन्यांपासून चुलबंद नदीवरील पूल बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन मशीन मागील २ दिवसांपासून झालेल्या पावसाने नदीला आलेल्या पुरात अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सोनी-आवळी चुलबंद नदीपात्रात उघडकीला आली.
अर्थसंकल्पीय तरतुदींतर्गत सुमारे दहा कोटी रुपये निधीच्या सोनी- आवळी चुलबंद नदीवर पूल बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार एका बांधकाम कंपनीअंतर्गत सदर पुलाची मागील सहा महिन्यांपासून बांधकाम केले जात आहे. या बांधकामासाठी कंत्राटदार कंपनीअंतर्गत मागील काही महिन्यांपासून क्रेन मशीनचा नियमित वापर सुरू आहे.
२ दिवसांपासून तालुक्यात पुरेशा प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वत्र ओढे व नाल्यातून पाणी वाहत असतानाच चुलबंद नदीच्या पाण्यातदेखील अचानक वाढ झाली आहे. पूल बांधकामासाठी वापरात असलेली क्रेन मशीन नदीपात्रात उभी असताना अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने क्रेन मशीन अडकल्याचे दिसून येत आहे. नदीतील पाण्यात क्रेन अडकल्याचा व्हिडीओ नागरिकांनी मोबाइल कैद केला असून, चांगलाच व्हायरल केला आहे.