पुरात पीक उद्ध्वस्त, नुकसानीमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने संपवलं जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 01:33 PM2022-08-30T13:33:19+5:302022-08-30T13:40:00+5:30
लाखांदूर तालुक्यातील घटना, आंब्याच्या झाडाला दोर बांधून घेतला गळफास
लाखांदूर (भंडारा) : अतिवृष्टीने सलग तीनदा पुराचा फटका बसून शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
गोविंदराव महादेव दाणी (वय ६७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे किन्ही गुंजेपार शिवारात सहा एकर शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी धानासह इतर पिकांची लागवड केली होती. मागील जुलै व ऑगस्ट महिन्यांत तालुक्यातील पावसाने तब्बल तीनदा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गोविंदराव यांच्या शेतातील पीक तीनदा पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले होते.
हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याने ते विवंचनेत होते. सोमवारी पहाटे घरातील मंडळी झोपेत असताना ते आपल्या शेतात पोहोचले. तेथे आंब्याच्या झाडाला नायलॉन दोर बांधून गळफास घेतला. सकाळी त्यांचा मुलगा शेतात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. पोलीस हवालदार दिलीप भोयर व अंमलदार अनिल राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.