गोसेच्या उजव्या कालव्यात वाहून गेलेल्या 'त्या' दोन्ही तरुणांचे मृतदेह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 12:04 PM2022-09-02T12:04:53+5:302022-09-02T12:10:20+5:30
पवनीची घटना : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील होते रहिवासी
पवनी (भंडारा) : गाेसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात वाहून गेलेल्या कापड विक्रेता दाेन्ही तरुणांचे अखेर मृतदेहच हाती आले. पोलीस व नागरिकांच्या शोध माेहिमेनंतर एकाचा मृतदेह बुधवारी रात्री तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर आढळला. आंघोळीसाठी कालव्यात उतरणे दोघांच्याही जीवावर बेतले.
निम्मू ऊर्फ नईम खान (२२) व अमीन शाह (३६) अशी मृतांची नावे आहे. दाेघेही मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी हाेते. ते नागपूर येथील भांडेवाडी येथे वास्तव्य करुन गावाेगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करीत हाेते. बुधवारी चाैघेजण एका व्हॅनने पवनी येथे कापड विक्रीसाठी आले. निलतारा रेस्टारंट जवळ थांबून कापड विकायला बसले. ऊन चांगलेच तापत असल्याने निम्मू आणि अमीन दाेघेजण निलज मार्गावरील गाेसे प्रकल्पाच्या कालव्यावर आंघाेळीसाठी गेले.
गोसेच्या उजव्या कालव्यात नागपूरचे दोन कापड विक्रेते गेले वाहून
आंघाेळीसाठी कालव्यात असलेल्या पायऱ्यावर दोघेही बसले होते. मात्र निम्मू हा अगदी शेवटच्या पायरी बसून आंघाेळ करीत होता. कालव्याच्या पाण्याचा वेग अधिक होता. त्यावेळी तो अंगावर पाणी घेण्यासाठी खाली वाकला आणि कालव्यात पडला. हा प्रकार सोबत असलेल्या अमीनला दिसताच त्याने निम्मूला वाचविण्यासाठी कालव्यात उडी घेतली. परंतु कालव्याच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने दोघेही वाहून गेले.
या घटनेची माहिती हाेताच पाेलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दाेघांना वाचविण्याचा प्रयत्न सुरु झाला. परंतु यश आले नाही. बुधवारी रात्री निम्मू खान याचा मृतदेह कालव्यात आढळून आला. मात्र अमीनचा शाेध लागत नव्हता दरम्यान गुरुवारी शाेध माेहीम राबविण्यात आली. त्यावेळी दुपारच्या सुमारास अमीनचा मृतदेह घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर आढळून आला.
मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द
कापड विक्रीच्या निमित्ताने मध्य प्रदेशातून आलेल्या दाेन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. गुरुवारी त्यांचे नातेवाईक पवनी येथे दाखल झाले. उत्तरीय तपासणी करुन दाेघांचे मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले.
आठ दिवसात पाच जणांचा मृत्यू
पवनी तालुक्यात आठ दिवसात पाच जणांचा बुडाल्याने मृत्यू झाला. पवनी तालुक्यातील अत्री येथे २९ ऑगस्ट राेजी प्रणय मेश्राम, संकेत रंगारी, साहिल रामटेके या तिघांचा गावालगतच्या मुरुमाच्या खाणीत बुडून मृत्यू झाला हाेता. या घटनेपाठाेपाठ बुधवारी दाेन कापड विक्रेत्यांचा मृत्यू झाला.
वैनगंगा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
वैनगंगा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा पाच दिवसानंतर शुक्रवारी सकाळी मृतदेहच आढला. आजविल दिलीप काटेखाये (१९) रा. चिचाळ ता. पवनी असे मृताचे नाव. पवनी येथील गोसे धरणाच्या मागच्या बाजूच्या पुलाजवळून २९ ॲागस्ट रोजी गेला होता वाहून. चंद्रपूर जिल्ह्यातील सवली येथे शुक्रवारी सकाळी वैनगंगा नदी पात्रात मृतदेह आढळला.