अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृदेहच आढळला; तावशी येथे चूलबंद नदीपात्रातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 12:02 PM2022-08-30T12:02:14+5:302022-08-30T12:03:54+5:30
नदीकाठावर अस्थी विसर्जन करण्यासाठी गेला असता प्रवाहात गेला होता वाहून
बारव्हा (भंडारा) : मोठ्या वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी नातेवाईकांसह गेलेल्या इसमाचा मृतदेह पाथरी येथील चूलबंद नदीपात्रात मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत रविवारी सायंकाळी आढळून आला. तो शनिवारी लाखांदूर तालुक्यातील तावशी येथील चूलबंद नदीकाठावर अस्थी विसर्जन करण्यासाठी गेला असता नदीत बुडाला होता.
धनराज एकनाथ शेंडे (३९) रा. तावशी ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मोठे वडील शंकर मारोती शेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या अस्थी घेऊन विसर्जनासाठी नातेवाईकांसह धनराज गावाशेजारील चूलबंद नदीवर शनिवारी गेला होता. रीतीरिवाजाप्रमाणे मुंडण करण्यासाठी केस ओले करण्यासाठी तो नदीत उतरला. मात्र, त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून गेला. तेथे हजर असलेल्या दोघांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती लागला नाही.
घटनेची माहिती दिघोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. नायब तहसीलदार देविदास पाथोडे, दिघोरी पोलिसांनी आपत्कालीन बोट आणून नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. दिवसभर शोधकार्य करून शोध न लागल्याने रात्री उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी रविवारी घटना स्थळापासून जवळपास तीन किमी अंतरावर पाथरी चूलबंद घाटावरील नदीपात्रात मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात मृतदेह अडकलेल्या अवस्थेत दिसून आला. दिघोरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.