आर्थिक मदतीसाठी मृतदेह आणला उपवनसंरक्षक कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 04:33 PM2024-06-26T16:33:50+5:302024-06-26T16:34:34+5:30

Bhandara : आर्थिक मदत मंजुरीसाठी सहकार्य करण्याचे वनाधिकाऱ्यांचे आश्वासन

The dead body was brought to the Conservator of Forests office for financial assistance | आर्थिक मदतीसाठी मृतदेह आणला उपवनसंरक्षक कार्यालयात

The dead body was brought to the Conservator of Forests office for financial assistance

भंडारा : रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ५३ वर्षीय इसम नागपूर येथील रुग्णालयात मृत्युशी झुंज देत असताना अखेर दहा दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मालावली. त्यानंतर आर्थिक मदत व पाल्याला नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी मृतदेह थेट उपवनसंरक्षक कार्यालयात आणून आंदोलन करण्यात आले. आर्थिक मदत मंजुरीसाठी सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन वनाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रवीण सिताराम वासनिक (५३, खुटसावरी, ता. भंडारा) असे मृत इसमाचे नाव आहे. ते एमआयडीसी येथील एका कंपनीत मजूर म्हणून कार्यरत आहेत. रविवारी (दि. १६) रोजी कामे आटोपून ते दुचाकीने स्वघरी जात होते. दरम्यान खुटसावरी ते गडेगाव डेपो फाट्यादरम्यान असलेल्या चिखली तलावाजवळील रोपवाटीकानजीक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर डॉक्टरांनी नागपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र २५ जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरची स्थिती बेताची व कमावता इसम मृत पावल्याने त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावला आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परीवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी खुटसावरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


उपवनसंरक्षकांना दिले निवेदन

उपचारादरम्यान मृत्युची बातमी गावात पसरताच हळहळ व्यक्त केले जात आहे. बुधवारी आर्थिक मदत व पाल्याला नोकरी देण्यात यावी, रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात यावे, या मागणीसाठी उपवनसंरक्षक कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये, नरेंद्र भोयर, मारोती करवाडे, राजकुमार वाहाणे,श्रीराम बोरकर, सरपंच ज्योती नंदेश्वर, ग्रामपंचायत सदस्य राकेश शेंडे, वृषाली शहारे, पोलिस पाटील संघदीप भोयर, शिवसेनेचे नरेंद्र पहाडे, आशिक चुटे, राकेश आग्रे, राष्ट्रवादीचे अजय मेश्राम तसेच शेकडो गावकरी उपस्थित होते. शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन उपवनसंरक्षक पवन जेफ यांना देऊन चर्चा केली. यावेळी वनपरीक्षेत्राधिकारी संजय मेंढे उपस्थित होते.
 

वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांनी दिली २० हजारांची मदत
मृत प्रवीण वासनिक यांच्या घरची स्थिती बेताची व कमावता इसम मृत पावल्याने त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावला आहे. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वनपरक्षेत्रधिकारी संजय मेंढे यांनी २० हजार रुपयांची आर्थिक मदत मृताच्या कुटूंबियांना दिली. यावेळी आंदालनकर्ते व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: The dead body was brought to the Conservator of Forests office for financial assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.