तुमसर व मोहाडी तालुक्यांतील पर्यटनस्थळांचा विकास रखडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:49 AM2024-11-15T11:49:27+5:302024-11-15T11:50:17+5:30
निधी वाटपात अन्याय : माडगी, चांदपूर गायमुख, धुटेरा तीर्थस्थळ उपेक्षीतच
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमेत तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ व जंगलाच्या समावेश आहे. मागील ४० वर्षांपासून उंटाच्या तोंडात जिरा याप्रमाणे येथे राज्य शासनाने निधी दिला. मागील अनेक वर्षांपासून येथील पर्यटनस्थळ, तीर्थस्थळ, उमरेड कन्हांडला अभयारण्याला लागून असलेल्या गावांचा विकास झाला नाही. निसर्गाने या तालुक्यांना भरभरून दिले आहे. शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा संपूर्ण परिसर उपेक्षित आहे. विकासाप्रति लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येते.
तुमसर व मोहाडी तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असून, जिल्ह्यात सर्वात अधिक जंगल या दोन्ही तालुक्यांच्या सीमेत आहे. तुमसर तालुक्याच्या सीमेत वैनगंगा नदी पात्रातील माडगी येथील मिनी पंढरी ही प्रसिद्ध तीर्थस्थळ असून, या तीर्थस्थळाच्या विकास अजूनपर्यंत झाला नाही. नदीपात्रात जल पर्यटनास वाव असूनही लोकप्रतिनिधींचे अजूनपर्यंत लक्ष गेले नाही.
गायमुख हे तीर्थस्थळ लहान महादेव म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. परंतु या स्थळाच्या विकासाच्या बाबतीत उपेक्षित आहे. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येत महादेवाची यात्रा भरते. येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून, त्या समस्या निधीअभावी रखडल्या आहेत.
बावनथडी प्रकल्प परिसरात पर्यटनस्थळाच्या प्रस्ताव ही शासन दरबारी रखडला असून, मागील दहा वर्षांपासून येथे नियमानुसार पर्यटनस्थळाची उभारणी करण्यात आली नाही. येथे अजूनही विकासाची प्रतीक्षा आहे.
गावे उपेक्षित
मोहाडी तालुक्याच्या टोकावरील शेवटचे गाव पालोरा आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर सातपुडा पर्वतरांगांमधील उमरेड- कहांडला हा राष्ट्रीय अभयारण्याच्या परिसर आहे. या परिसरातील गावे ही अजूनही उपेक्षित आहेत. येथेही जंगल सफारी व पर्यटनाच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
ग्रीन व्हॅली चांदपूर प्रतीक्षेत
राज्य व राष्ट्रीयस्तराचे नेते येथे नतमस्तक होण्याकरिता हनुमान मंदिरात नित्यनेमाने येतात. येथील तीर्थस्थळाचा विकास मात्र झालेला नाही. ग्रीन व्हॅली चांदपूरच्या प्रस्ताव शासन दरबारी रखडला आहे. सातपुडा पर्वतरांगांत असलेला येथील तलाव हा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाच्या तलाव म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. येथेही जल पर्यटनाला मोठा वाव असूनही येथे जल पर्यटनाला चालना देण्यात आली नाही. तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर नाकाडोंगरी या गावाजवळ धुटेरा हे तीर्थस्थळही उपेक्षीत आहे.