डांभेविरली येथे रोजगारसेवक पदासाठी झाली चक्क निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 05:00 AM2022-02-09T05:00:00+5:302022-02-09T05:00:17+5:30
डांभेविरली येथील रोजगारसेवकाचे पद रिक्त असल्याने संबंधित पद भरण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पात्र ८ उमेदवारांना गावातील ६६४ नागरिकांनी मतदान केले. या नागरिकांत ३५० पुरुष मतदारांचा समावेश होता, तर ३१४ महिला मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत हिरालाल बुराडे यांनी १७२ मते घेत विजय मिळविला असून त्यांची रोजगारसेकपदी निवड करण्यात आली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : गत वर्षभरापासून ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त रोजगार सेवकाचे पद भरतीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका पदासाठी गावातील तब्बल ८ उमेदवारांनी अर्ज केल्याने ग्रामसभेच्या मागणीवरून प्रत्यक्ष मतदान पद्धतीचा अवलंब करीत निवडणूक घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली येथील कार्यालयात ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.
डांभेविरली ग्रामपंचायत अंतर्गत गत वर्षभरापूर्वीपासून रोजगार सेवकाचे पद रिक्त आहे. ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध करताना ग्रामपंचायत प्रशासन अंतर्गत रोजगारसेवक पदासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायतीला रोजगारसेवक पदासाठी प्राप्त एकूण ९ उमेदवारांनी अर्ज आले हाेते. त्यापैकी भोजुराम बुराडेनामक उमेदवारांनी रोजगार सेवक पदासाठीचे अर्ज मागे घेतल्याने या पदासाठी ८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले.
पात्र उमेदवारांमधून रोजगारसेवक पदासाठी एका उमेदवाराच्या निवडीसबंधाने ग्रामसभा अध्यक्षांनी ग्रामसभेत चर्चा केली. यावेळी निवडीसाठी चिठ्ठीद्वारे मतदान प्रक्रिया घेऊन निवडणूक करण्याची मागणी केली. ग्रामसभेच्या मागणी अंतर्गत महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे मतदान केंद्र निर्माण केले होते. निवडणूक प्रक्रियेत भरत राऊत, गणेश डिब्बे, अभय दोनाडकर, सोपान धोटे, रविकिरण गायकवाड, गोपीचंद शेंडे, हिरालाल बुराडे व दीपक रामटेके आदी उमेदवरांना गावकऱ्यांनी मतदान केले.
हिरालाल बुराडे यांचा १७२ मतांनी विजय
- डांभेविरली येथील रोजगारसेवकाचे पद रिक्त असल्याने संबंधित पद भरण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पात्र ८ उमेदवारांना गावातील ६६४ नागरिकांनी मतदान केले. या नागरिकांत ३५० पुरुष मतदारांचा समावेश होता, तर ३१४ महिला मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत हिरालाल बुराडे यांनी १७२ मते घेत विजय मिळविला असून त्यांची रोजगारसेकपदी निवड करण्यात आली आहे.
ग्रामसभेमध्ये केली गावकऱ्यांनी मागणी
- ग्रामसभा अंतर्गत रोजगारसेवक निवडीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज ग्रामपंचायतीला प्राप्त झाले होते. अर्जांचे ग्रामसभेत वाचन करून ग्रामसभेला उपस्थित नागरिकांना निवड प्रक्रिया सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी मतदान घेऊन निवडणूक प्रक्रियेची मागणी केल्याने १ रोजगारसेवक पदासाठी ८ उमेदवारांत निवडणूक घेण्यात आली.