गळफास घेऊन शेतकऱ्याने संपवले जीवन; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: August 22, 2023 05:34 PM2023-08-22T17:34:22+5:302023-08-22T17:38:00+5:30
आकस्मिक मृत्यूची नोंद
भंडारा : मागील काही वर्षांपासून मद्याच्या आहारी गेलल्या एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतशिवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव (को) शेत शिवारात उघडकीस आली. भिवा देवाजी मडावी (५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिस सूत्रानुसार, भिवा यांची पिंपळगाव (को) शिवारात शेतजमीन आहे. शेतीमध्ये शेतकऱ्याने यंदाच्या खरीप हंगामा अंतर्गत धान पिकाची लागवड केली होती. पिकांची पाहणी करण्यासाठी शेतकरी नियमित शेतात जात असे. सोमवारी त्याने आपण शेतात पाणी देण्यासाठी जात असल्याचे कुटुंबियांना सांगितले. शेतकरी शेतावर गेल्यानंतर त्याचा पुतण्या मुन्ना मडावी शेतात गेला असता भिवा स्वतःच्या शेतशिवारातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आला.
मुन्नाने ही माहिती कुटुंबीयांसह लाखांदूर पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार विलास मातेरे, पोलीस अंमलदार टेकचंद बुरडे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे