पेटवला कचरा आगीने रौद्ररूप धारण केले अन् ‘व्हॅन’ची राखरांगाेळी झाली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 10:37 AM2022-05-09T10:37:42+5:302022-05-09T10:41:49+5:30
कचरा पेटवायला गेले आणि व्हॅन पेटवून आले, अशीच चर्चा आता शहरभर रंगली आहे.
भंडारा : शहरातील तकिया परिसराला लागून असलेल्या एका लॉनसमोर असलेला कचरा अज्ञात व्यक्तीने पेटविला. आग पसरत गेल्याने कचऱ्यासोबतच २० फूट अंतरावर असलेल्या व्हॅननेही पेट घेतला. पाहता पाहता आगीचा भडका उडाला. वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवारी रात्री ११.१० वाजताच्या सुमारास घडली. कचरा पेटवायला गेले आणि व्हॅन पेटवून आले, अशीच चर्चा आता शहरभर रंगली आहे.
राजीव गांधी चौक ते नागपूर नाका या परिसरात असलेल्या रस्त्यावर ए-वन लॉन आहे. या लॉनच्या कडेला काही भंगार अवस्थेत असलेली वाहनेही उभी करून ठेवण्यात आली आहे. याचवेळी लॉन समोर असलेला कचरा एका अज्ञात व्यक्तीने जाळला. कचरा जाळला त्या स्थळापासून व्हॅन २० फूट अंतरावर उभी होती. कचऱ्यासोबत भंगार अवस्थेतील या व्हॅनलाही आग लागली. कचऱ्यासोबत व्हॅनलाही आग लागेल याची जाण आग लावणाऱ्याने ठेवली नसावी. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.
व्हॅनचा झाला काेळसा
आगीचा भडका उडताच आरडाओरड सुरू झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही लोकांनी धाव घेत पाण्याचा माराही केला. त्याचवेळी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. थोड्याच वेळात अग्निशमन बंब तिथे येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत मारुती व्हॅनचा कोळसा झाला होता. जवळच विजेचे खांबही होते, मात्र आग विझल्याने मोठा अनर्थ टळला. ही व्हॅन अझहर खान यांच्या मालकीची असल्याचे समजते. कचरा पेटविताना थोडीशी सावधगिरी बाळगावी, असा सल्लाही या घटनेने दिला आहे.