सभापती निवडीत अध्यक्ष निवडणुकीचाच फॉर्म्युला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 05:00 AM2022-05-20T05:00:00+5:302022-05-20T05:00:24+5:30
समाजकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसकडून वडद गटाचे मदन रामटेके, तर विरोधी गटाकडून धारगाव गटाच्या अपक्ष अस्मिता डोंगरे यांनी, महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये यांनी, तर भाजपच्या एकोडी गटाच्या माहेश्वरी नेवारे आणि लाखोरी गटाच्या सुर्मीला पटले यांनी नामांकन दाखल केले. पटले यांनी नामांकन मागे घेतले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीचाच फॉर्म्युला कायम ठेवत काँग्रेसने सभापतीपदावरही वर्चस्व मिळविले. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत समाजकल्याण सभापतीपदी काँग्रेसचे मदन रामटके, महिला व बालकल्याण सभापतीपदी काँग्रेसच्या स्वाती वाघाये, तर दोन इतर सभापतीपदी कॉंग्रेसचे रमेश पारधी व अपक्ष राजेश सेलोकर यांची वर्णी लागली.
समाजकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसकडून वडद गटाचे मदन रामटेके, तर विरोधी गटाकडून धारगाव गटाच्या अपक्ष अस्मिता डोंगरे यांनी, महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये यांनी, तर भाजपच्या एकोडी गटाच्या माहेश्वरी नेवारे आणि लाखोरी गटाच्या सुर्मीला पटले यांनी नामांकन दाखल केले. पटले यांनी नामांकन मागे घेतले. इतर दोन सभापतीपदासाठी काँग्रेसकडून बपेरा गटाचे रमेश पारधी यांचे, तर विरोधी गटाकडून शिवसेनेच्या सावरला गटाच्या राजश्री तिघरे आणि देव्हाडी गटाचे अपक्ष राजेश सेलोकर यांच्या विरोधात मुरमाडी तुपकर गटाचे गणेश निरगुडे यांनी नामांकन दाखल केले होते. प्रत्येक सभापतीपदासाठी दोन-दोन नामांकन आल्याने मतदान घेण्यात आले. यात २७ विरुद्ध २५ असे मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांनी काम पाहिले.
तुमसरचे वर्चस्व; तीन तालुक्याला भोपळा
- काँग्रेस व राष्ट्रवादी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसने भाजपा बंडखोर गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. अध्यक्षपद पवनी तालुक्याला तर उपाध्यक्षपद तुमसर तालुक्याला मिळाले होते. तुमसर तालुक्याच्या वाट्याला दोन सभापतीपद मिळाले. त्यामुळे तुमसर तालुक्याला सर्वाधिक तीन पदाधिकारी मिळाले. जिल्हा परिषदेत साकोली व लाखनी तालुक्याला संधी मिळाली. मोहाडी, लाखांदूर व भंडारा तालुक्याला भोपळा मिळाला.
- काँग्रेसकडून सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक होते. निवडणुकीच्या दोन तास आधी महिला जिल्हा परिषद सदस्याने नाराजी व्यक्त करीत निघून गेल्या. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळण्याची चर्चा होती. परंतु सभा सुरू होण्याआधी नाराजी दूर करण्यात यश आले. काँग्रेस पुन्हा एकवटल्याने विरोधकांना संधी मिळाली नाही.
- अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजप आणि बंडखोर यांच्यात सभागृहातच हाणामारी झाली. वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. विरोधात गुन्हेही दाखल झाले होते. सभापती निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक शांततेत पार पडली.
- सभापतींची निवडणूक पार पडताच विजयोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक वाद्य डफळीचा आवाज जिल्हा परिषदेच्या आवारात गुंजला. यावेळी विकास फाउंडेशनचे माजी आमदार चरण वाघमारे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, मधुकर लिचडे, प्रेमसागर गणवीर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अटकपूर्व जामीन मिळाला अन् मनसुबे उधळले
- गुन्हा दाखल असलेल्या उपाध्यक्षांसह एका सदस्याला बुधवारी अटकपूर्व जामीन मिळाल्याने सभापतीपदासाठी उत्सुक असलेल्या विरोधकांचे मनसुबे उधळले गेले. अध्यक्ष निवडीच्या वेळी सभागृहात हाणामारी झाली होती. त्यावरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले आणि सदस्य उमेश पाटील यांच्यासह सभापती नंदू रहांगडाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सभापती निवडणुकीच्या वेळी ते सभागृहात येतील त्यावेळी त्यांना पोलीस अटक करतील, अशी विरोधी गटाला अपेक्षा होती. याच संधीचा फायदा घेत सभापतीपद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणीही झाली होती. मात्र विरोधकांना कोणतीच संधी मिळाली नाही.