अन् प्रियकराच्या डोळ्यावर पट्टी बांधून प्रेयसीने केला कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 10:56 AM2022-10-29T10:56:29+5:302022-10-29T10:56:51+5:30
झिरी देवस्थानच्या पहाडीवरील घटना
जवाहरनगर (भंडारा) : प्रेमाच्या त्रिकोणात पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला सरप्राइज गिफ्ट आणल्याचे सांगत डोळ्यावर पट्टी बांधून प्रेयसीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या पहाडीवर गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना त्यांच्या राहत्या घरून शुक्रवारी अटक केली.
गोकुळ नामदेव वंजारी (२२), रा. मौदी पहेला असे जखमी प्रियकराचे नाव आहे. भंडारा तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे नीरज पडोळे (२४), रा. मानेगाव बाजार याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. त्यात गोकुल वंजारी याची एंट्री झाली. पाच ते सहा महिन्यांपासून त्याचे प्रेमप्रकरण सुरू झाले. दरम्यान, गोकुळने नीरजची साथ सोड, असे आपल्या प्रेयसीला सांगितले. तिने ही माहिती पहिला प्रियकर नीरज यास दिली. त्यांनी गोकुळचा काटा काढण्याचा कट रचला. त्याला झिरी देवस्थानच्या टेकडीवर बोलाविले आणि हल्ला केला.
याप्रकरणी प्रेयसीसह नीरज पडोळे याच्या विरुद्ध भादंवि ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी ठाणेदार सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार पुडके, शिंगाडे, वैरागडे महिला पोलीस हिरेखन, गणवीर यांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, शुक्रवारी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी बोलावून हल्ला
प्रेयसीने गोकुळला नांदोरा झिरीवर ये, तिथे तुला सरप्राइज गिफ्ट देतो असे सांगितले. त्याप्रमाणे गोकुळला झिरी येथील देवस्थानच्या पहाडीवर गेला. तेथे गेल्यावर प्रेयसीने तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले आहे. प्रथम तू डोळे बंद कर असे म्हणत डोळ्यावर रुमालाने पट्टी बांधली. स्कार्फच्या साह्याने दोन्ही हात मागे करून बांधले. त्याचवेळी प्रेयसीने आपल्याजवळील धारदार कोयत्याने डोक्यावर, मागील बाजूस वार केला. गोकुळ कसाबसा डोळ्याची पट्टी काढून आयुध निर्माणी परिसरात धावत सुटला. परिसरातील नागरिकांना या प्रकारची माहिती दिली. नागरिकांनी त्याला जवाहरनगर ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.