राज्यपालांनी जाणून घेतल्या जिल्ह्याच्या विकासविषयक अपेक्षा आणि संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:45 PM2024-10-01T13:45:01+5:302024-10-01T13:46:16+5:30
विविध घटकांशी संवाद : सेवा-उद्योग क्षेत्राला बळकटी देण्याची व्यक्त केली गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी भंडारा जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकासविषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनाबाबत विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.
नियोजित दौऱ्यानुसार सकाळी १० वाजता राज्यपालांचे विश्रामगृहावर आगमन झाले. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात जिल्ह्याच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थितीबाबत, तसेच उद्योग व जिल्हा विकास आराखड्यानुसार विकासाच्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले.
राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, वरिष्ठ पत्रकार, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी, उमेद व अंगणवाडी महिला प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त विपिन इटनकर, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपवनसंरक्षक राहुल गवई यासह वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते. शहापूर येथील हेलिपॅडवर प्रशासनाच्या वतीने राज्यपालांचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
टसर उद्योगाचे कौतुक
जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या चळवळीविषयी, तसेच टसर, कोसा आणि अन्य रेशीम उत्पादनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. पंतप्रधानांनी मन की बात'मध्ये या उपक्रमाचे कौतुक केल्याबद्दल त्यांनी महिला बचत गटाचे कौतुक केले. बचत गटांनी तयार केलेल्या साडीचेही त्यांनी अवलोकन करून त्यांच्या कार्याची प्रसंशा केली.
मागासलेपणाची भावना ठेवू नका
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यपाल म्हणाले, कोणत्याही जिल्ह्याने मागासलेपणाची भावना ठेवू नये. मनातून ती दूर करून विकासाच्या संधींमधून प्रगती साधायची आहे. राज्यात मुंबईचा विकास अधिक झाला आहे. मात्र, तेथून मिळणाऱ्या महसुलातूनच अन्य जिल्ह्यांतील विकासकामे होतात. त्यामधूनच राज्याचा एकत्रित विकास होतो. महाराष्ट्र माझ्यासाठी एकच घर आहे.
या मुद्यांवर झाली चर्चा
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे आणि भविष्यात आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत चर्चा झाली. यासोबतच, राष्ट्रीय महामार्गाची समस्या, वाहतुकीशी संबंधित बाबी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, गोसेखुर्द प्रकल्प- ग्रस्तांचे पुनर्वसन, वैद्यकीय महावि- द्यालय, वाळू उपसा, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आदी प्रमुख विषय मांडण्यात आले. उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास, पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन, पर्यटन विकास, नाग नदीमुळे होणारे वैनगंगा नदीचे प्रदूषण, मत्स्य, झिंगा, लाख व शिंगाडा उत्पादन, भंडारा शहराचा रखडलेला ड्रोन सीटी सव्र्व्हे, दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन, धान रोवणी मजुरांचे वीज कोसळल्याने झालेले बळी, पवनीचा पर्यटन विकास आदी मांडलेले विषय राज्यपालांनी समजून घेतले.