पुरुषांनाही लागले दागिन्यांचे वेड... तरुणांमध्ये कोणत्या दागिन्यांची आहे क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 11:43 AM2022-03-09T11:43:58+5:302022-03-09T11:53:18+5:30
पुरुषांसाठी आता कानातले टॉप्स, साखळी, अंगठ्या तसेच ब्रेसलेट्स उपलब्ध आहेत. शौक व त्यात आपले स्टेटस दाखविण्यासाठीही पुरुष आता हे दागिने घालत आहेत.
भंडारा : दागिने म्हटले म्हणजे महिलांचा जीव की प्राण. मात्र, दागिन्यांचे हे वेड आता फक्त महिलांपुरतेच मर्यादित राहिले नसून आजघडीला पुरुषही अंगावर दागिने घालून मिरविताना दिसतात. विशेष म्हणजे, पुरुषांसाठी आता कानातले टॉप्स, साखळी, अंगठ्या तसेच ब्रेसलेट्स उपलब्ध आहेत. शौक व त्यात आपले स्टेटस दाखविण्यासाठीही पुरुष आता हे दागिने घालत आहेत.
पुरुषांना काय काय आवडते?
साखळी : गळ्यातील साखळी हा प्रकार अत्यंत जुना आहे. किमान ४ ग्रॅमपासून सोन्याची व चांदीची साखळी रेडिमेड उपलब्ध होत असून, आपल्या मर्जीनुसार तयार करता येते.
ब्रेसलेट : आजघडीला हातातून घडी गायब होत असून, तिची जागा ब्रेसलेट घेताना दिसत आहे. १० ग्रॅमपासून ब्रेसलेट तयार होत असून, यात सोने किंवा चांदीतून अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
अंगठी : हातातल्या बोटांमध्ये अंगठ्या घालणे कित्येकांना पसंत असते. कित्येक जण सर्वच बोटांमध्ये अंगठ्या घालतात. किमान २ ग्रॅमपासून अंगठी उपलब्ध असून, पुढे आपल्या मर्जीनुसार ती बनविता येते किंवा मोठ्या प्रमाणात अंगठ्यांचे डिझाईन्स रेडिमेड उपलब्ध आहेत.
पेंडेंटपस : मुली ज्याप्रमाणे आपल्या कानात विविध प्रकारचे कानातले घालतात. त्याच प्रकारे आता मुलांसाठीही कानातले उपलब्ध आहेत. यात सध्या डायमंड वर्कला जास्त मागणी दिसून येत आहे. आपल्या एका किंवा दोन्ही कानांत बाली घालून मोठ्या संख्येने पुरुष आता दिसून येत आहेत.
दागिने वापरणारे म्हणतात..
दागिने हा प्रकार महिलांसाठीच नसून पुरुषसुद्धा घालू शकतात; म्हणूनच आम्हीसुद्धा ते घालतो. कानातले, गळ्यात साखळी व ब्रेसलेट हे काही नवे नसून आता त्यांची क्रेझ वाढू लागली आहे.
- शशी शामराव राजूरकर, शहापूर
दागिने घालण्याची आवड महिलांना असते तशी आता पुरुषांनाही आहे. मला हाताच्या विविध बोटांत अंगठ्या व गळ्यात साखळी घालण्याची आवड आहे. त्यानुसार मी हे दागिने घालतो.
- एक युवक.