लाखांदूर बाजार समितीवर काँग्रेसची अभेद्य सत्ता !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:51 AM2023-05-24T11:51:08+5:302023-05-24T11:54:01+5:30
सभापतीपदी सुरेश ब्राह्मणकर तर उपसभापतीपदी देविदास पारधी
लाखांदूर (भंडारा) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्पित पॅनलने सलग ४५ वर्षांपासून बाजार समितीवर अभेद्य सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून डॉ. सुरेश ब्राह्मणकर तर उपसभापतीपदी देविदास पारधी यांची निवड एकमताने करण्यात आली.
१८ संचालकपद असलेल्या लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मागील महिन्यात २९ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत भाजप-राकाँ समर्थित पॅनेलचे ७ तर काँग्रेस समर्थित पॅनेलचे अंतर्गत ११ संचालक निवडून आले होते. त्यानुसार २३ मे रोजी लाखांदूर बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक आयोजित करण्यात आली होती.
या निवडणुकी अंतर्गत सभापती पदासाठी भाजप - राकाँ समर्थित पॅनेलचे डेलीस कुमार ठाकरे, प्रमोद प्रधान तर काँग्रेस समर्थित पॅनेल अंतर्गत डॉ. सुरेश ब्राह्मणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपसभापती पदासाठी भाजप - राकाँ समर्पित पॅनेल अंतर्गत तेजराम दिवठे तर काँग्रेस समर्थित पॅनेल अंतर्गत देविदास पारधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
भाजप समर्थित पॅनेल अंतर्गत सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डेलीसकुमार ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपा अंतर्गत प्रमोद प्रधान तर काँग्रेस अंतर्गत डॉ. सुरेश ब्राह्मणकर सभापती पदाच्या निवडणूक रिंगणात उभे होते. यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रमोद प्रधान यांना ७ तर काँग्रेसचे डॉ. सुरेश ब्राह्मणकर यांना ११ मते मिळाल्याने डॉ. सुरेश ब्राह्मणकर यांना सभापती म्हणून घोषित करण्यात आले.
उपसभापती पदासाठी भाजप समर्थित पॅनेल अंतर्गत तेजराम दिवठे तर काँग्रेस पक्षांतर्गत देविदास पारधी निवडणूक रिंगणात उभे होते. यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीत तेजराम दिवठे यांना ८ तर देविदास पारधी यांना १० मते मिळाल्याने देविदास पारधी यांना उपसभापती म्हणून घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिवराज हटवार तर सहायक निर्णय अधिकारी म्हणून लाखांदूरचे गोपाल वेलेकर यांनी काम पाहिले.
उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे १ मत फुटले
लाखांदूर बाजार समिती निवडणुकीत १८ संचालकांंपैकी काँग्रेस समर्थित पॅनेल अंतर्गत ११ संचालक तर भाजप-समर्थित पॅनल अंतर्गत केवळ ७ उमेदवार निवडून आले होते. त्यानुसार २३ मे रोजी सभापती, उपसभापती निवडणूक अंतर्गत काँग्रेस समर्थित उमेदवारांना एकूण ११ मते अपेक्षित होती. मात्र उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक मतदान प्रक्रियेत काँग्रेस समर्थित उमेदवाराला ११ ऐवजी केवळ १० मते पडल्याने काँग्रेस समर्थित संचालकाचा १ मत फुटल्याचे दिसून आले.