'त्या' दोन्ही दाम्पत्याचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:34 IST2024-11-30T11:27:27+5:302024-11-30T11:34:21+5:30
चांदोरी आणि पिपरी येथे गावावर पसरली शोककळा : राजेगाव-मोरगाव व कुंभली येथील प्रवाशाचा मृतांमध्ये समावेश

The journey of both 'that' couple to Gondia was the last
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/साकोली/शहापूर: गोंदिया जिल्ह्यातील सहक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डव्वा येथे शिवशाही बस उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवासी जागीच ठार झालेत, यात भंडारा तालुक्यातील पिपरी येथील तथा साकोली तालुक्यातील चांदोरी येथील प्रत्येकी एका दाम्पत्याचा समावेश आहे. या दोन्ही दाम्पत्याचा शिवशाही बसमधील प्रवास शेवटचा ठरला. राजेश देवराम लांजेवार व मंगला राजेश लांजेवार रा. पिपरी आणि रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनौजे रा. चांदोरी अशी या मृत दाम्पत्यांची नावे आहेत. या दाम्पत्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच गावात शोककळा पसरली.
माहितीनुसार, साकोली तालुक्याच्या चांदोरी येथील मूळ रहिवासी असलेले रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनोजे यांची विवाहित मुलगी गोंदिया येथे राहते. मुलीला भेटण्यासाठी कनोजे दाम्पत्य यांनी साकोली येथून शिवशाही पकडली होती. याच दरम्यान कनोजे दाम्पत्यावर काळाने झडप घातली. या अपघातात या वृद्ध दाम्पत्याचा जागीच करूण अंत झाला, वृत्त लिहीपर्यंत कनोजे दाम्पत्यांचे मृतदेह त्यांच्या स्वगावी चांदोरी या ठिकाणी पोहोचले नव्हते.
दूसरे दाम्पत्य भंडारा तालुक्यातील पिपरी येथील आहेत. राजेश देवराम लांजेवार (३८) व मंगला राजेश लांजेवार (३०) हे दाम्पत्य अपघातात ठार झाले. यावेळी त्यांचा दोन वर्षीय मुलगा रियांशु त्यांच्यासोबत होता. त्याच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. गावात राजेश व त्याचे कुटुंबीय संयुक्तपणे राहतात. कुटुंबात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. परिसरातील गावांमध्ये जाऊन पान साहित्य विकून तो आपला उदरनिर्वाह चालवीत होता. गोंदिया जिल्ह्यातील दांडेगाव येथील नातेवाईक गोंदिया येथील रुग्णालयात भरती आहे. त्याला बघण्यासाठी राजेश व मंगला लांजेवार हे सकाळीच भंडारा येथून शिवशाहीने गोंदियासाठी निघाले होते. राजेश लांजेवार यांना आठ वर्षाची मुलगी आहे. ती घरी आपल्या आजी- आजोबांसोबत होती. दरम्यान ११ मृतांपैकी दोघांची ओळख पटली नव्हती. रात्री उशिरा त्यांची ओळख पटली, लाखनी तालुक्यातील राजेगाव (मोरगाव) येथील उदाराम तुकडू खेडकर व कुंभली येथील प्रकाश हेमणे यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
मुले झाली पोरगी
राजेश व मंगला लांजेवार या दाम्पत्याला मुलगा व मुलगी आहे. रियांशू दोन वर्षांचा तर मुलगी आठ वर्षाची आहे. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूने दोन्ही मुले अनाथ झाली आहे. घरी आजी-आजोबा, मोठे बाबा, आई असली तरी आई-वडिलांच्या प्रेमापासून दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.
दाम्पत्याचा शेवटही सोबतच
कनौजे दापत्य मुलीच्या भेटीसाठी गौदिवाला सोबतच निघाले. सोबतच संपूर्ण आयुष्य घालवलेल्या कनोजे दांपत्याचा शेवटही सोबतच झाला. रामचंद कनोजे यांना एक मुलगा व पाच मुली, नातवंड असा आप्तपरिवार आहे.