भयंकर! साकोली तालुक्यातील श्रद्धाचा मारेकरी निघाला शेजारचाच अल्पवयीन मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 07:08 PM2022-12-07T19:08:01+5:302022-12-07T19:08:58+5:30
साकोली तालुक्यातील पापडा येथील श्रद्धा किशोर सिडाम (८) ही बालिका २८ नोव्हेंबर रोजी शाळेतून घरी आल्यावर बेपत्ता झाली होती.
साकोली (भंडारा) - संपूर्ण विदर्भात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा सिडाम या बालिकेच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांचा तब्बल दहा दिवसानंतर यश आले. श्रद्धाचा मारेकरी घराशेजारील अल्पवयीन मुलगाच निघाला. अत्याचाराच्या प्रयत्नात श्रद्धाचे तोंड दाबल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तणसीच्या ढिगाऱ्यात जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
साकोली तालुक्यातील पापडा येथील श्रद्धा किशोर सिडाम (८) ही बालिका २८ नोव्हेंबर रोजी शाळेतून घरी आल्यावर बेपत्ता झाली होती. दोन दिवसानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी गावाजवळील शेतातील तणाच्या ढिगाऱ्यात तिचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह विरष्ठ अधिकारी तळ ठोकून होते. या प्रकरणात ३ डिसेंबर रोजी श्रद्धाचा चुलत भाऊ अजय पांडूरंग सिडाम याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली. मात्र चार दिवसात त्याने कोणतीही माहिती दिली नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांच्यासह ठाणेदार जितेंद्र बोरकर पापडा गावात तळ ठोकून होते. दरम्यान पोलिसांनी बुधवारी दुपारी श्रद्धाच्या घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. त्याने अत्याचाराच्या प्रयत्नात श्रद्धाचे तोंड दाबले. त्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी भादंवि ३०२, २०१ आणि बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोधमोहिमेत श्वान घुटमळत होते अल्पवयीन मुलाच्या घरासमोर
श्रद्धाच्या मारेकऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. शोध मोहीमेत श्वान अल्पवयीन मुलाच्या घरासमोर जावून थांबत होते. परंतु तपासादरम्यान कोणतीच माहिती मिळत नव्हती. दरम्यान बुधवारी या प्रकरणाचा उलगडा झाला.
खड्ड्यात पुरलेला मृतदेह पोत्यात भरून नेला शेतात
श्वास गुदमरून श्रद्धाचा मृत्यू झाल्यानंतर अल्पवयीन मुलाने मृतदेह एका पोत्यात भरला. घरामागील खड्ड्यात ठेवून त्यावर तणस आणि केरकचरा टाकला. दुर्गंधी येवू नये म्हणून त्यावर थिमेटचे द्रावणही टाकले. इकडे पोलिस गावात शोध घेत असताना ३० नोव्हेंबरच्या रात्री त्याने संधी साधून श्रद्धाचा मृतदेह पोत्यासह खड्ड्यातून काढून घरामागील शेतात नेला आणि तणसाच्या ढिगाऱ्यात नेवून जाळले, अशी माहिती आहे.