नुकसान लाखोंचे झाले, खात्यात आले मात्र पाच हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:56 PM2024-10-21T12:56:05+5:302024-10-21T12:57:37+5:30

व्यथा पूरग्रस्तांची: पुनर्वसनाचा तिढाही कायम

The loss was in lakhs, but only five thousand came into the account | नुकसान लाखोंचे झाले, खात्यात आले मात्र पाच हजार

The loss was in lakhs, but only five thousand came into the account

विलास खोब्रागडे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
सिल्ली:
धरणाचे बॅक वॉटर आणि नदीच्या पुरामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील गावे तसेच भंडारा शहरालगतच्या लोक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे लाखोचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून पूरग्रस्त नागरिकांना केवळ पाच हजारावर बोळवण करण्यात आली. ही मदत म्हणजे पूरग्रस्त नागरिकांची थट्टाच असल्याची लोकांची तीव्र भावना आहे.

जिल्ह्यात ११ व १२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाने नदी, नाले आणि धरणे तुडुंब भरले. धरणातील पाण्याचे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आले. वैनगंगा नदीची २४५.५० मीटर जलसाठा पातळी ओलांडून भंडारा शहरानजीकच्या गणेशपूर व भोजापूर नाल्यालगतच्या सत्कार नगर, नेहरू वॉर्ड, छत्रपती शाहूनगर, महात्मा फुले कॉलनी इत्यादी लोक वसाहतीला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला. दोन ते तीन दिवस पूर पीडित नागरिकांना बेघर व्हावे लागले. 


नकली पूरग्रस्तांना दुहेरी लाभ
भंडारा शहारातील पूर प्रभावित क्षेत्रातील काही लोकांना घराचा मोबदला दिला आणि ऐच्छिक पुनर्वसन करून घरे संपादित केली. मात्र लोकांनी मोबदला घेऊनही घरे सोडली नाही. अनेकांनी सरकार जमा झालेल्या घरात भाडेकरू ठेवले. काही लोकांनी पुनर्वसनात सरकारने संपादित केलेल्या घरांची रजिस्ट्री होत नाही, संपादित झालेली बुडीत घरे नोटरी करून परस्पर दुसऱ्यांना विकले. ही बुडीत वस्ती जैसे थे आहे.


पाच हजारावर बोळवण 
पूर ओसरल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पूर पीडितांना सरकारी मदत देण्यासाठी प्रशासनाने पूरग्रस्त भागातील बुडीत घरांचे पंचनामे केले होते. गत आठवड्यात विधानसभेचे बिगुल वाजण्यापूर्वी काही पूर पीडितांच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झाले. तर काहींच्या खात्यात छदामही आले नाही. त्यामुळे दोन दिवस पुराच्या पाण्यात अन्न, धान्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सामानासह इतरही लाखों रुपयाचे नुकसान झाले. मात्र सरकारने केवळ पाच हजार नुकसान भरपाई दिली. त्यामुळे ही पूरग्रस्त नागरिकांची थट्टाच असल्याचे नागरिक बोलत आहे.
 

Web Title: The loss was in lakhs, but only five thousand came into the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.