वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते दृश्य-श्राव्य प्रणालीने उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:25 PM2024-10-09T13:25:21+5:302024-10-09T13:27:04+5:30
Bhandara : महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सुरू होणार तात्पुरते कामकाज
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :भंडारा जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी आणि दरवर्षी किमान १०० नवीन डॉक्टर्स तयार व्हावेत या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बुधवारी (दि.९) दुपारी १२ वाजता औपचारिक उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून त्याचे उद्घाटन करणार आहेत.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया सिंह पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित राहणार आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजता मेडिकल कॉलेजचे ऑनलाइन उद्घाटन होणार असून या निमित्त येथील नियोजन भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, अभिजीत वंजारी, सुधाकर अडाबले, नाना पटोले, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
मुद्द्यावरुन झाले होते राजकारण
गेल्या महिनाभरापुर्वी वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द झाल्याचे जाहीर झाल्यावर या मुद्द्यावरुन राजकीय मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र अखेर राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालयासोबत येथीलही प्रश्न सुटला आहे.
२०२२ मध्ये मिळाली होती मान्यता
भंडारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला ऑगस्ट २०२२ मध्ये मान्यता मिळाली होती. गेल्या वर्षी २८ जून रोजी राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील पलाडी येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ हेक्टर जागेची निवड करण्यात आली. यावर्षी जून महिन्यात काही त्रुटींमुळे वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मान्यता रद्द केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मान्यता बहाल केली. पलाडी येथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने येथील महिला रुग्णालयाच्या इमारतीत वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.