लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी पालिका प्रशासन सज्ज; कृत्रिम कुंडाची सुविधा

By युवराज गोमास | Published: September 25, 2023 05:09 PM2023-09-25T17:09:29+5:302023-09-25T17:10:11+5:30

सर्चलाइट व लाइफगार्डसह बोटींची व्यवस्था

The municipal administration is ready for the farewell of beloved Ganaraya; Artificial pond facility | लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी पालिका प्रशासन सज्ज; कृत्रिम कुंडाची सुविधा

लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी पालिका प्रशासन सज्ज; कृत्रिम कुंडाची सुविधा

googlenewsNext

भंडारा : लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी भंडारा पालिकेने विशेष तयारी केली आहे. विसर्जनस्थळी स्वच्छता, पाणी, सर्चलाइट, लाइफगार्ड, निर्माल्य कलश व कृत्रिम कुंडाची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहेत. गणेशभक्तांना सुविधा मिळाव्यात, यासाठी नगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे.

शहरात व जिल्ह्यात बाप्पाच्या भक्तांची कमी नाही. बाप्पाला निरोप देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अनंत चतुर्दशीला सर्वच घरांतील गणरायांना निरोप दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरात सहा विसर्जनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. मोठे सार्वजनिक गणपती वगळता सर्व घरगुती गणेशमूर्ती या कृत्रिम हौदात विसर्जित केले जाणार आहेत. सध्या सर्वत्र भजन, कीर्तन, आरत्यांचे स्वर कानी पडत असून भक्ती व आस्थेचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. बहुतांश भाविक अनंत चतुर्दशीलाच बाप्पाचा निरोप घेणार आहेत.

विसर्जनस्थळी कर्मचाऱ्यांची तैनाती

पालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या स्थळी कर्मचाऱ्यांचे पथक तैनात राहणार आहेत. यात वैनगंगा नदीवर तीन मुकादम व १३ कर्मचारी, मिस्कीन टँक येथे एक मुकादम ८ कर्मचारी, पिंगलाई माता मंदिर येथे १ मुकादम सहा कर्मचारी, सागर तलाव येथे दोन मुकादम ६ कर्मचारी दुपारी २ ते रात्री १२ वाजतापर्यंत हजर राहणार आहेत. कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी गणवेशात व ओळखपत्र समोर ठेवून हजर राहावे, अन्यथा पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.

निरोपासाठी नियुक्त केलेली ठिकाणे

भंडारा शहरातील भाविकांना ‘श्री’ निरोप देणे सोयीचे व्हावे, यादृष्टीने सहा स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. यात वैनगंगा नदी, सागर तलाव, खांब तलाव, मिस्कीन टँक तलाव, पिंगलाई बोडी व प्रगती कॉलनी मैदान या ठिकाणांचा समावेश आहे. कारघा येथे वैनगंगा नदीजवळ ४. मिस्कीन टँक २. खांब तलाव २, पिंगलाई माता मंदिर २ आणि प्रगती कॉलनी मैदान या ठिकाणी २, असे एकूण १२ कृत्रिम हौद ठेवण्यात आले आहेत. मूर्तीचे हौदात विसर्जन केले जाते. तसेच निर्माल्य वेगळ्या कुंडात गोळा केले जात आहे.

विसर्जन घाटांवर सुसज्जता

आपक्कालीन स्थितीसाठी बोट, डोंगे, फायर ब्रिगेड, मोठे दोरखंड, टॉर्च आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विसर्जन स्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. विसर्जन घाटावर प्रखर विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत कनिष्ठ अभियंता मोनिक वानखेडे, स्वच्छता निरीक्षक दिनेश भवसागर, मुकेश शेंदरे, सहायक नगररचनाकार मुकेश कापसे, सहायक लिपिक संग्राम कटकवार, मिथुन मेश्राम यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांनी बाप्पाला निरोप देताना खोल पाण्यात जाऊ नये. पालिकेने भाविकांच्या सुविधांसाठी उपाययोजना केल्या आहेत. सुविधांचा लाभ घ्यावा, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाविकांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात.

- विनोद जाधव, मुख्याधिकारी न.प., भंडारा.

Web Title: The municipal administration is ready for the farewell of beloved Ganaraya; Artificial pond facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.