'त्या' सांगाड्याचे रहस्य उलगडले, मुलानेच खून करून आईचे प्रेत फेकले होते जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 02:08 PM2024-09-28T14:08:00+5:302024-09-28T14:09:37+5:30
मुलाविरुद्ध गुन्हा दाखल : अवघ्या १२ तासात पोलिसांनी लावला छडा
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : लाखांदूर ते साकोली राष्ट्रीय महामार्गावरील दांडेगाव जंगलात आढळलेल्या महिलेच्या सांगाड्याचे रहस्य आता उलगडले आहे. आईसोबत वारंवार भांडण करणाऱ्या मुलानेच आईचा खून करून नंतर मृतदेह पोत्यामध्ये बांधून जंगलात फेकला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. चित्रलेखा ऊर्फ रेखा अरुण वासनिक (४५) असे या मृत महिलेचे नाव असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित अरुण वासनिक (२५) असे आहे. दिघोरी (मोठी) या गावातील ते रहिवासी आहेत.
जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना गुरुवारी अज्ञात महिलेचा सांगाडा आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे द्रुतगतीने फिरविली. परिसरातील मिसिंग असणाऱ्या महिलांची माहिती मिळवून शोध घेतला असता संशयाची सुई दिघोरी या गावाकडे वळली. यात, गावातील चित्रलेखा ऊर्फ रेखा अरुण वासनिक ही महिला बेपत्ता असल्याचे तपासात पुढे आले. यावरून अधिक चौकशी करून संशयित म्हणून सुमितला ताब्यात घेतले. तो नेहमीच आपल्या आईसोबत भांडण करायचा. याच काळात ६ मे च्या दरम्यान त्याने आईला जीवानिशी मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून दांडेगाव जंगल परिसरात नेऊन फेकल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेत सीमा ज्ञानेश्वर मेश्राम (४०) रा. दिघोरी मोठी यांच्या तक्रारीवरून व ठाणेदार यांच्या आदेशावरून दिघोरी मोठी पोलिसांत संशयित आरोपी सुमित विरोधात भादंविचे कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.
स्वतःच दाखल केली होती आई हरविल्याची तक्रार
आईचा खून केल्यानंतर सुमितने स्वतः दिघोरी पोलिस ठाण्यात जाऊन आई हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तो साळसुदपणे गावात फिरत होता. तो मजुरीच्या कामावर जायचा तसेच त्याला मद्यपानाची सवय होती, अशी माहिती आहे.
आईसोबत व्हायचे रोज भांडण
सुमित आपल्या आईसोबत रोज भांडण करायचा. अनेकदा हे भांडण कडाक्याचे होत असे. याची माहिती शेजाऱ्यांनाही होती. मात्र तो असे काही टोकाचे पाऊल उचलेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. गावातच या महिलेची लहान बहीण सीमा ज्ञानेश्वर मेश्राम (४०) राहते. तिलाही त्याच्या स्वभावाबद्दल माहिती होती. मे महिन्यात बहीण बेपत्ता झाल्यावर दिघोरी (मोठी) पोलिसात हरविल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. सीमा मेश्राम यांच्या तक्रारीवरूनच या घटनेत सुमितविरुद्ध खुनाचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे.