'त्या' जळालेल्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले, नागपुरातील दोघांनी केली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 05:46 PM2023-04-20T17:46:38+5:302023-04-20T17:48:03+5:30
आधी आवळला गळा, नंतर डिझेल टाकून जाळले
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : गडेगाव वनविभागाच्या लाकूड आगराच्या जंगल परिसरात १३ एप्रिलला जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचा उलगडा करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील दोन आरोपींना अटक केली आहे.
मोहम्मद तनवीर अब्दुल रज्जाक शहा (२४, मुदलियार ले-आउट, शांतीनगर नागपूर) असे या ओळख पटलेल्या मृताचे नाव आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यामध्ये अतिक लातिफ शेख (२९, शांतीनगर, नागपूर) आणि फैजन परवेज खान (१८, बिहाड, ता. हिंगणा) असे आहे.
१३ एप्रिलला पोलिसांना गडेगाव वनविभागाच्या परिसरात महामार्गापासून २०० मीटर अंतरावर हा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला होता. त्याच्या अंगावरील सर्व कपडे आणि मृतदेह पूर्णत: जळाल्याने पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान होते. या तपासासाठी पोलिसांनी राज्यातील सर्व मिसिंगच्या तक्रारी तपासल्या. यात शांतीनगर येथील मोहम्मद तनवीर अब्दुल रज्जाक शहा हा ६ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तपासाचा धागा जुळवून या दोन आरोपींना अटक केली.
कारमधील डिझेल काढून जाळला मृतदेह
जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद तनवीर यांचे अतिक व फैजान यांच्याशी यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणानंतर मोहम्मद तनवीर याने या दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. या दोघांकडूनही एकमेकांना जीवे मारण्याचे आव्हान देणे सुरूच होते. दरम्यान ६ एप्रिलला अतिक शेख याने मोहम्मद तनवीर याला गाठून माफी मागण्याचा बहाना केला. आपल्या इंडिका या वाहनाने फिरायला जाऊ असे सांगून त्याने फैजन परवेज याला सोबत घेऊन महामार्गाने लाखनीकडे आणले. दरम्यान वाटेत त्याच्याशी भांडण झाले. यात या दोघांनी मोहम्मदचा दुपट्टा आणि दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर गडेगाव वनविभाग लाकूड आगाराजवळ महामार्गापासून २००किलोमीटरवर जंगल परिसरात मृतदेह नेऊन इंडिकातील डिझेल काढून जाळून टाकला. त्यानंतर ते लगेच नागपूरकडे निघाले.
टोल टॅक्सवरील सीसीटिव्ही फुटेजमध्ये सापडले पुरावे
या प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल टॅक्सवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ६ एप्रिलला इंडिका कारचा नंबर आणि अन्य बाबींचा उलगडा झाला. मोहम्मद नागपुरातील चौकातून कारमध्ये सोबत घेतल्याचे पुरावेही मिळविले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.