एमआयडीसी नावाची फक्त शान अन् उद्योगाला आहे वाण !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:39 AM2024-11-11T11:39:12+5:302024-11-11T11:41:58+5:30
उद्योगाची स्थिती बिकट : रोजगाराचा प्रश्न आला ऐरणीवर
राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यात अपेक्षित असा उद्योगांचा विकास नाही. रोजगाराच्या आशा कायम आहेत. वरठी येथील सनफ्लॅग कंपनीचा अपवादवगळता तालुक्यातील मिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नावापुरतीच दिसत आहे. त्यामुळे औद्योगिक रोजगाराचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या ऐरणीवर येणार काय? याकडे बेरोजगारांचे लक्ष लागले आहे. मोहाडीत असलेली एमआयडीसी 'नावाची शान अन उद्योगाला वाण' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मोहाडी - तुमसर मार्गावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा मिनी इंडस्ट्रियल एरिया आहे. या ठिकाणी बोटावर मोजण्याएवढे उद्योग आहेत. परंतु, अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असे उद्योगच दिसून येत नाहीत. मोहाडीच्या एमआयडीसी क्षेत्रात अनेकांनी भूखंड ताब्यात घेतले. मात्र, उद्योगाची निर्मिती होऊ शकली नाही. सनफ्लॅग वरठी येथे स्थिर झालेल्या उद्योगात रोजगार दिला जातो. देव्हाडा येथे असलेला साखर कारखाना व एलोरा पेपर मिल येथे हवा तेवढा रोजगार मिळत नाही. बारमाही हाताला काम मिळेल असा एकही उद्योग मोहाडीत नाही. तालुक्यातील बेरोजगार रोजगाराच्या शोधात तालुक्याच्या बाहेर पडत असतात.
मोहाडी तालुक्यात महिलांचे गावागावात बचत गट आहेत. पण, प्रत्येक गटाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग केंद्र उभारण्यात आलेले नाही मोहाडीतील क्रीडा संकुल अनेक दिवसांपासून न्यायालयात अडकून पडले आहे. क्रीडांगण, क्रीडा साहित्याचा अभाव क्रीडा स्पर्धा घेण्यास अनेक अडचणींना समोर जावे लागते. ३३ कोटीची पाणीपुरवठा योजना अजूनही कार्यान्वित झाली नाही. परिणामी मोहाडीच्या जनतेला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मिरची व्यवसायाला उद्योगाची योग्य चालना देण्यात आली नाही. पेंच प्रकल्प असो की, बावनथडी प्रकल्प शेवटच्या टोकावर असणाऱ्या शेतकऱ्याला 'टेल टू हेड' असे पाण्याचे वितरण होत नाही.
'दुग्ध व्यवसायाचा उद्योग नाही'
मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. तालुक्यातील अनेक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुसरीकडे अनेक गावांमध्ये खासगी दुग्ध संकलन केंद्र दिसून येतात. तालुक्यातील दूध खासगी मालकांना विक्री केला जातो जातो. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध संकलित होत असले तरी इथे दुधावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही उद्योग उभारला गेला नाही.
'जमिनी गेल्या, प्रकल्प आलाच नाही'
एक दशकापूर्वी रोहणा येथे वीज प्रकल्पाची निर्मिती होईल, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. परंतु, त्यानंतर एक टक्काही वीज प्रकल्पाचे काम कुठेच दिसून येत नाही. वीज प्रकल्प उभे झाले असते, तर आजघडीला हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले असते.