वृद्धेच्या खुनाला चार दिवसांनी फुटली वाचा; 'या' कारणातून पुतण्यानेच काढला काकूचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:51 AM2023-08-07T11:51:14+5:302023-08-07T11:52:59+5:30

देवरी गंदो येथील घटना

The old aunt was killed by the nephew over property dispute | वृद्धेच्या खुनाला चार दिवसांनी फुटली वाचा; 'या' कारणातून पुतण्यानेच काढला काकूचा काटा

वृद्धेच्या खुनाला चार दिवसांनी फुटली वाचा; 'या' कारणातून पुतण्यानेच काढला काकूचा काटा

googlenewsNext

पालांदूर (भंडारा) : शेतीच्या जुन्या वादातून डोक्यात सल ठेवून चुलत पुतण्यानेच वृद्ध काकूला नाक, तोंड व गळा दाबून जागीच ठार केले. देवलाबाई किसन गेडाम (५५, रा. देवरी (गोंदी) ता. लाखनी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास देवरी-किटाडी जंगल परिसरात घडली. मात्र, तब्बल चार दिवसांनी या खून प्रकरणाला वाचा फुटली. यात स्वप्नील अभिमान गेडाम (३१, रा. किटाडी, ता. लाखनी) असे आरोपीचे नाव आहे.

देवलाबाईच्या लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच पतीचे निधन झाले होते. देवलाबाई माहेरी देवरी/गोंदी येथे राहायला आली. परंतु सासरच्या सामूहिक जमिनीवर वारसा हक्काने सातबाऱ्यावर नाव होते. चुलत दीर अभिमान जयराम गेडाम यांच्यासोबत वाद होता. देवलाबाईला अपत्य नसल्याने तिच्या सासरच्या चुलत परिवाराला देवलाबाईला हक्क द्यायचा नव्हता. हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत सुरू आहे.

१ ऑगस्टला सायंकाळी खून झाल्यानंतर २ ऑगस्टला देवरी येथील पोलिस पाटलांनी घटनेची माहिती पोलिस स्टेशन पालांदूरला दिली. ठाणेदार व्ही. एम. चहांदे घटनास्थळावर पोहोचले. प्रत्यक्ष स्थिती बघून शंका कुशकांना जागा दिसली. परंतु इतरांना घातपात असावा, असा संशय नव्हता. पालांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधिकारी ईश्वर काकडे, सहायक पोलिस अधीक्षक सुशांत सिंग यांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदनाकरिता स्वतः ठाणेदार चहांदे गेले. प्रथम लाखनीनंतर भंडारा येते शवविच्छेदन न करता पुढे नागपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तोंडी रिपोर्टनुसार देवलाबाईचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे कळले.

त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. स्वप्नीलने दोन दिवसांपूर्वी किटाडी गावात देवलाबाई राहणार नाही व शेतीची खटखट मिटेल, असे बोलल्याचे गुप्त माहितीतून पुढे आले. तोच धागा पकडून तपास सुरू केला. स्वप्नीलला विश्वासात घेऊन विचारणा करताच त्याने खुनाची कबुली दिली. जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाची सुद्धा मोलाची मदत झाली. तपास सपोनि चहांदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मडावी, सहायक फौजदार ओमप्रकाश केवट, पोशी नावेद पठाण व भालचंद्र अंडेल करीत आहेत.

देवलाबाई गेली होती सात्या शोधायला

स्वप्नील हा अभिमानचा लहान मुलगा असून, अविवाहित आहे. देवलाबाई गेडाम या रानभाज्या गोळा करण्याचे काम करायची. घटनेच्या दिवशी स्वप्नीलला जंगलात सात्या शोधताना देवलाबाई जंगलातील देवरी किटाडी रस्त्यात दिसली. स्वप्नीलने तिला शेतीचा जुना वाद उकरून काढला. यात त्यांच्यात बाचाबाची झाली. याचवेळी त्याने तिच्या गालावर दोन-तीन थापड व बुक्क्या मारून जमिनीवर पाडले. त्यानंतर नाक तोंड व गळा दाबून तिचा खून केला.

Web Title: The old aunt was killed by the nephew over property dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.