प्रति ब्रास ६०० रुपये भावाची रेती झाली ११०० ते १५०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 01:01 PM2024-09-25T13:01:48+5:302024-09-25T13:04:39+5:30
Bhandara : बांधकाम व्यवसाय झाला ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेती चोरीला आळा बसावा याकरिता राज्य शासनाने शासकीय रेती डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी प्रति ब्रास ६०० रुपये इतका भाव होता, तर यावर्षी ११०० ते १५०० इतका ठरविण्यात आला आहे. सर्वसामान्यांना रेती आता प्रति ट्रॅक्टर ३५०० रुपयाने खरेदी करावी लागत आहे. सध्या शहर व ग्रामीण भागातील बांधकाम ठप्प पडले आहेत. शासकीय रेती डेपो सुरू करून सर्वसामान्यांना येथे तोटा झाल्याचे दिसून येते.
तुमसर तालुक्यात सध्या महसूल प्रशासनाने शासकीय रेती डेपो सोंड्या, मांडवी, लोभी, आष्टी, चारगाव येथे सुरू केले आहे. तुमसर तालुक्यातील रेती ही उच्च गुणवत्तेची असल्याने तिला मोठी मागणी महानगरात आहे. नदीपात्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा महसूल प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार पाच घाटांवर शासकीय रेती डेपो सुरू केला आहे. मागील वर्षी प्रति ब्रास रेतीचा भाव ६०० रुपये इतका होता. यावर्षी शासकीय रेती डेपोवर भाव हा ११००, १२०० व १५०० इतका आकारण्यात आला आहे.
ऑनलाइन नोंदणी करावी
शासकीय रेती डेपोतून ऑनलाईन नोंदणी करावी लागते. सर्वसामान्य नागरिकही येथे ऑनलाइन नोंदणी करू शकतात; परंतु अनेकांना नोंदणी करण्याची प्रक्रिया माहिती नाही. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना याबाबत अजूनही जनजागृती झाली नसल्याने ट्रॅक्टर चालकांकडूनच रेती खरेदी केली जात आहे. रेती डेपोवर यावर्षी प्रतिब्रास रेतीची किंमत दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे रेती व्यवसाय करणाऱ्यांचाही नाईलाज आहे. महसूल प्रशासनाने येथे दखल घेऊन स्थानिकांना रेती कमी दरात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
तालुक्यात ट्रॅक्टरची संख्या अडीच ते तीन हजार
तुमसर तालुक्यात अडीच ते तीन हजार ट्रॅक्टरची संख्या असून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी येथे करण्यात आले. त्यामुळे त्याची किस्त पटवावी लागते. त्यामुळे हा व्यवसाय येथे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.