घाट बंद झाल्याने रेतीचे भाव गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 05:00 AM2022-05-26T05:00:00+5:302022-05-26T05:00:47+5:30

मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावरून रेती काढणे सध्या बंद असल्याने रेतीचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. मोहाडीच्या तहसीलदारांनी रोहा घाटावर दिवस, रात्र खडा पहारा सुरू केल्याने नेहमी ट्रॅक्टरने गजबजलेल्या या रेतीघाटावर शुकशुकाट आहे. रेती चोरी बंद झाल्याने रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून सततच्या कारवाईला त्रासून व कर्जाचे हप्ते थकीत झाल्याने अनेकांनी आपले वाहन विक्रीसाठी काढले आहेत.

The price of sand skyrocketed due to the closure of the ghat | घाट बंद झाल्याने रेतीचे भाव गगनाला

घाट बंद झाल्याने रेतीचे भाव गगनाला

googlenewsNext

सिराज शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील काही रेतीघाटावर येथील तहसीलदार दीपक कारंडे यांनी महसूल कर्मचाऱ्यांचा खडा पहारा लावल्याने दररोज होणारी शेकडो ब्रास रेतीची चोरी थांबली आहे. मात्र रोहा घाटाला लागूनच असलेल्या तुमसर तालुक्यातील सुकळी रेती घाटात मात्र रेती चोरी सुरूच आहे. तेथील रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. 
मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावरून रेती काढणे सध्या बंद असल्याने रेतीचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. मोहाडीच्या तहसीलदारांनी रोहा घाटावर दिवस, रात्र खडा पहारा सुरू केल्याने नेहमी ट्रॅक्टरने गजबजलेल्या या रेतीघाटावर शुकशुकाट आहे. रेती चोरी बंद झाल्याने रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून सततच्या कारवाईला त्रासून व कर्जाचे हप्ते थकीत झाल्याने अनेकांनी आपले वाहन विक्रीसाठी काढले आहेत. परंतु लागूनच असलेल्या तुमसर तालुक्यातील सुकळी रेती घाटाला मात्र इतर घाट बंद असल्याने सुगीचे दिवस आले आहे. 
सुकळी रेती घाटावरून पांजरा, खरबी- डोंगरगाव मार्गे आंधळगाव क्षेत्रात सर्रास ट्रॅक्टरने रेती वाहतूक सुरू आहे. रेती घाट बंद झाल्याने मोहाडी शहर व परिसरातील रस्ते व घर बांधकामावर मोठे संकट उद्भवले आहे. रेती मिळत नसल्याने व रेतीचे भाव तीन हजार प्रती ट्रॅक्टर झाल्याने अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने दिलेल्या गरीब लोकांच्या घरकुलाचे कामही रेतीअभावी बंद पडले आहे. 

तहसीलदारांवर पाळत
- मोहाडीचे तहसीलदार कारंडे यांचा रेतीमाफियांनी एवढा धसका घेतला आहे की ते कुठे आहेत, काय करीत आहेत हे पाहण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात तीन - चार व्यक्ती त्यांच्यावर पाळत ठेवायचे. ते कार्यालयाबाहेर निघताच तिकडे रेती घाटावर सूचना पोहचत असे. त्यांच्या वाहनांच्या मागे दुचाकीने किंवा चारचाकी वाहनाने हद्दीबाहेर जात पर्यंत त्यांचा पाठलाग व्हायचा. त्यांचे वाहन मोहाडीकडून कोणत्याही रेती घाटाकडे वळताच सर्वच रेती घाटातील जेसीबी, ट्रॅक्टर क्षणार्धात गायब व्हायचे. त्यामुळे तहसीलदारांना अनेकवेळा पक्की खबर मिळूनही रिकाम्या हाती परत यावे लागत होते. त्यामुळे दोन तीन वेळा तर त्यांनी खासगी वाहनाने गुप्तपणे जाऊन जेसीबी, टिप्परवर कारवाई केलीच. आता तर सरळ रेती घाटावरच पहारा सुरू केला आहे.

दाभा चौकी नावापुरतीच
- अवैध रेतीवर आळा घालण्यासाठी दाभा मोडीवर पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. मात्र ही चौकी नावापुरतीच आहे की काय अशी शंका येते.  कारण पूर्वी सुकळी, बेटाळा, कुरोडा येथून विनारायल्टीची भरलेली रेतीचे टिप्पर या चौकीसमोरून पहाटेला व सायंकाळी बिनदिक्कतपणे पसार व्हायचे. त्यामुळे या चौकीवर बंदोबस्तावर असलेले पोलीस डोळे बंद करून राहत होते की चिरीमिरी देऊन टिप्पर सोडले जात होते, अशी चर्चा जनमानसात सुरू राहणे स्वाभाविकच आहे. 

 

Web Title: The price of sand skyrocketed due to the closure of the ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू