भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के, नागपूर विभागात द्वितीय स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 03:27 PM2023-06-02T15:27:55+5:302023-06-02T15:30:05+5:30
दहावीच्या निकालात भंडारा जिल्ह्यातून लाखनी तालुका अव्वल तर पवनी तालुका पिछाडीवर
इंद्रपाल कटकवार
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात भंडारा जिल्ह्याने नागपूर विभागातून दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला. यावेळीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. निकालाच्या टक्केवारीत जवळपास पाच टक्के अधिक मुली परीक्षेत पास झाल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत १६ हजार १७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ८२ विद्यार्थी परीक्षेला प्रत्यक्षरीत्या बसले होते. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १५ हजार ६३ इतकी आहे. यात प्रावीण्य श्रेणीत ३८३१ तर प्रथम श्रेणी ६३६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत ४०७७ तर ७९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८५१० मुले तर ७७४४ मुलींचा सहभाग होता. यापैकी ७६२१ मुले तर ७४४९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.७२ तर मुलींची ९६.१९ टक्के इतकी आहे.
निकालात लाखनी प्रथम तर पवनी तालुका पिछाडीवर
शुक्रवारी लागलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात भंडारा जिल्ह्यातून लाखनी तालुका अव्वल तर पवनी तालुका पिछाडीवर आहे. लाखनी तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ९५.६१ टक्के इतकी आहे. द्वितीय क्रमांकावर लाखांदूर असून त्याची टक्केवारी ९५.०८ टक्के आहे. तृतीय स्थानी साकोली असून ९४.२५ टक्के, चतुर्थ स्थानी मोहाडी ९३.४१ टक्के, पाचव्या ठिकाणी भंडारा तालुका असून त्याची टक्केवारी ९३.२१ टक्के आहे. सहाव्या ठिकाणी तुमसर असून त्याची टक्केवारी ९३.१९ तर सातव्या ठिकाणी पवनी तालुका असून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९२.१६ टक्के आहे,
तालुकानिहाय विद्यार्थ्यांची उत्तीर्ण संख्या
भंडारा तालुक्यातून ३५५७ पैकी ३५३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ३२९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.२७ तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.४३ टक्के आहे. लाखांदूर तालुक्यातून १६९२ पैकी १६६७ विद्यार्थी परीक्षेला बसते. त्यापैकी १५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९३.४७ टक्के मुले तर ९६.८४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. लाखनी तालुक्यातून १५५८ पैकी १५५२ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १४८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९७.८९ टक्के, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९३.६८ टक्के आहे. मोहाडी तालुक्यातून १९५८ विद्यार्थ्यांपैकी १९४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. १८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.८४ टक्के तर मुलींची टक्केवारी ९७.२३ टक्के आहे. पवनी तालुक्यातून २२०६ विद्यार्थ्यांपैकी २१९५ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात २०२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.८२ टक्के असून मुलींची टक्केवारी ९४.५५ टक्के आहे. साकोली तालुक्यातून २२५५ विद्यार्थ्यांपैकी २२४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात २११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.३९, तर मुलींची ९६.३३ टक्के इतकी आहे. तुमसर तालुक्यातील २९४५ पैकी २९४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.२६ असून मुलींची टक्केवारी ९६.६४ टक्के आहे
शंभर टक्के निकालाच्या ७१ शाळा
जिल्ह्यातील २८४ शाळांमधून एकूण १६ हजार १७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १६ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. या शाळांपैकी ७१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात भंडारा तालुक्यातील १२, लाखांदूर १०, लाखनी ११, मोहाडी ४, पवनी १०, साकोली १० तर तुमसर तालुक्यातील १४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.