रोहयो यंत्रणा जिल्ह्यात माघारली; सहा महिन्यांत केवळ ३०.६५ टक्के कामे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:19 PM2024-09-30T13:19:37+5:302024-09-30T13:22:08+5:30
११८६३ कामांपैकी ३६३६ कामे पूर्ण: ८२२७ कामे अपूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ११,८६३ मजूरप्रधान कामे सुरू करण्यात आली. सहा महिन्यांत त्यापैकी केवळ ३,६३६ कामे पूर्ण झाली, तर ८,२२७ कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होण्याची टक्केवारी ३०.६५ इतकी आहे. यंदा रोहयो यंत्रणा माघारल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे.
रोहयोंतर्गत ग्रामीण मजुरांना अकुशल कामे उपलब्ध केली जातात. यामुळे शहराकडे होणारे मजुरांचे पलायन थांबण्यास मदत मिळते. गावातच 'मागेल त्याला काम व कामानुसार दाम' उपलब्ध होते. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते.
मजुरीचे पैसे थेट बँकेत जमा होत असल्याने गैरप्रकाराला चाप बसला आहे. शिवाय मोजमापानुसार मजुरी उपलब्ध होत असल्याने मजुरांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. 'रोजगार हमी अर्धे आम्ही, अर्धे तुम्ही' हा प्रकार आता होताना दिसत नाही.
मजुरीवर ११५.४८ कोटींचा खर्च
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात एप्रिल, मे व जून महिन्यांत सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाला. अकुशल कामांवर एकूण ८७ कोटी १० लाखांचा खर्च करण्यात आला. कुशल, अकुशल व प्रशासकीय खर्च मिळून ११५.४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
मे महिन्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात १० लाख ४८ हजार १४१ मनुष्य दिवस रोजगार मजुरांना उपलब्ध झाला.
मे महिन्यात २० लाख ३७ हजार २६१, जून १२ लाख २ हजार ४७४, जुलै ३ लाख ७ हजार ७४१, ऑगस्ट १ लाख ८ हजार ८३५ तर सप्टेंबर- पर्यंत ५४ हजार ६७९ मनुष्य दिवस रोजगार रोहयो प्रशासनाकडून पुरविण्यात आला.
तालुकानिहाय झालेली कामे
तालुका सुरु कामे पूर्ण कामे अपूर्ण कामे टक्केवारी
भंडारा १४९६ २८९ १२०७ १९.३२
लाखांदूर १६१३ ३२७ १२८६ २०.२७
लाखनी १७४८ ९४७ ८०१ ५४.१८
मोहाडी १९९२ ४९८ १४९४ २५.००
पवनी १४८९ ३८५ ११०४ २५.८६
साकोली १५५४ ८२१ ७३३ ५२.८३
तुमसर १९७१ ३६९ १६०२ १८.७२
एकूण ११८६३ ३६३६ ८२२७ ३०.६५
"यंदाच्या आर्थिक वर्षात ११८६३ रोहयो कामे सुरू झाली. त्यापैकी ३६३६ कामे पूर्ण तर ८२२७ कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होण्याची टक्केवारी ३०.६५ इतकी आहे. पावसाळ्यात कामे बंद असतात."
- रमेश पारधी, गटविकास अधिकारी नरेगा, भंडारा.