अन् दोन महिन्यांपासून बेपत्ता वृद्धाचा सांगाडाच सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 04:38 PM2022-03-24T16:38:14+5:302022-03-24T17:44:33+5:30
२० जानेवारी रोजी ते घरून निघून गेले होते. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही त्यांच्या थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाइकांनी साकोली ठाण्यात तक्रार नोंदविली.
साकोली/एकोडी (भंडारा) : दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका वृद्धाचा मृतदेह गुरुवारी तालुक्यातील बाम्पेवाडा शिवारात आढळून आला. केवळ सांगाडाच शिल्लक असून, मृत्यू नेमका कशाने झाला, हे मात्र कळू शकले नाही. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
ताराचंद इस्तारी किरणाके (वय ६३, रा. सातलवाडा, ता. साकोली) असे मृताचे नाव आहे. तो २० जानेवारी रोजी घरून निघून गेला होता. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही थांगपत्ता लागला नाही. नातेवाइकांनी साकोली ठाण्यात तक्रार नोंदविली. कुटुंबीयासह पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, एकोडी परिसरात एका शेतशिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, नेमका मृतदेह कुठे आहे? याचा थांगपत्ता लागत नव्हता.
गुरुवारी बाम्पेवाडा शिवाराकडे कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. त्या दिशेने नागरिकांचे लक्ष गेले. तेथे मानवी सांगाडा आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी शर्ट, पॅन्ट घातलेला एक मृतदेह दिसून आला. मृतदेह साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. नातेवाइकांनी कपड्यावरून मृतदेह ताराचंदचा असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे ताराचंद हा मनोरुग्ण असल्याची माहिती आहे. मात्र, त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे मात्र कळू शकले नाही.
उत्तरीय तपासणी झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट
मनोरुग्ण असलेला ताराचंद दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा कुजलेल्या अवस्थेत आणि सांगाडाच आढळून आला. मात्र, त्याचा मृत्यू कशाने झाला हे तूर्तास कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर ताराचंदचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे साकोली पोलिसांनी सांगितले.