जंगल शिवारात आढळला अज्ञात महिलेचा सांगाडा
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 26, 2024 12:44 PM2024-09-26T12:44:11+5:302024-09-26T12:45:00+5:30
दांडेगाव जंगल शिवारातील घटना : विविध तर्क वितर्कांना उधान
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर ( भंडारा) : जंगल शिवारात एका विवाहित महिलेचा सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दांडेगाव जंगल शिवारात उघडकीस आली. हा घातपात, वन्य प्राण्याचा हल्ला की अन्य काय अशा विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
आज सकाळच्या सुमारास काही गुराखी जंगल शिवारात जनावरे चराईसाठी घेऊन जात असतांना लाखांदूर ते साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल शिवारात एका महिलेचा सांगाडा त्यांना दिसून आला. या घटनेची माहिती त्यांनी गावकऱ्यांसह लाखांदूर व दिघोरी (मोठी) पोलिसांना दिली.
महामार्गालगतच्या जंगलात एक डोक्याची कवटी, हाताचे हाड व अन्य काही साहित्य दिसत आहेत. बाजूलाच साडी असून महिलेचे केस व मंगळसूत्र दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळसूत्र व साडीवरून हा सांगाडा महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
घटनेची माहिती होताच पोलीस उपअधीक्षक ईश्वर काकडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, दिघोरीचे ठाणेदार अमर धंदर, अड्याळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू, नंदेश्वर, क्षेत्र सहाय्यक सय्यद, पोलीस हवालदार उमेश वलके, घनश्याम कोडापे, हितेश मडावी, राजेश शेंडे, वच्छला चाचेरे, वनरक्षक सुषमा नरवाडे, यासह अन्य पोलीस अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.