उपचाराहून गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: January 13, 2024 05:19 PM2024-01-13T17:19:11+5:302024-01-13T17:19:55+5:30

नागपुरातून उपचार घेऊन ही महिला परतीच्या प्रवासात भंडारा बसस्टॉपवरून जाण्यासाठी साकोली आगाराची बस क्रमांक एम. एच.४० वाय.५३९६ मध्ये साकोलीला जाण्यासाठी मुलासह निघाली होती.

The theft of jewelery from the purse of a woman who was returning to the village from treatment | उपचाराहून गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

उपचाराहून गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

भंडारा : नागपूरच्या रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज प्रवासादरम्यान चोरीस गेल्याचा प्रकार घडला. आधीच आजारपणामुळे दु:खात असलेल्या या महिलेवर या चोरीच्या प्रसंगामुळे मोठे संकटच कोसळले आहे.
ही घटना लाखनी बसस्थानकावर शिनवारी घडली. रेखा तेजराम झोडे (५७, बोदरा (देऊळगाव) ता.अर्जुनी/मोर) असे या महिलेचे नाव असून ती आपला मुलगा मिथुन याच्यासह भंडारा बसस्थानकावरून साकोलीकडे जाण्यास निघाली होती. या प्रवासादरम्यान हा प्रकार तिच्या लक्षात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून उपचार घेऊन ही महिला परतीच्या प्रवासात भंडारा बसस्टॉपवरून जाण्यासाठी साकोली आगाराची बस क्रमांक एम. एच.४० वाय.५३९६ मध्ये साकोलीला जाण्यासाठी मुलासह निघाली होती. दरम्यान तिकीट काढण्यासाठी तिने आपली पर्स पाहिली असता चेन उघडी दिसली. पर्स पाहिली असता पर्समधील १० ग्रॅमचे सोन्याचे मनी, ३ ग्रॅम लॉकेट व एक हजार रुपये असा एकूण रोख रकमेसह ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केल्यावर कुणाकडेही चोरीचा ऐवज आढळला नाही. यावरून बसमध्ये चोरी झाली नसून भंडारा बसस्थानक किंवा बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. लाखनी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बस पोचली थेट पोलीस ठाण्यात

आपल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने रडारड सुरू केली. यामुळे बसचालक आशिष धुर्वे व वाहक सहादेव केवट यांनी बस थेट लाखनी पोलीस ठाण्यात नेली. पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांना घटनेची माहिती दिल्यावर महिला पोलीस कर्मचारी योगिता सिंगनजुडे, मनीषा खेडीकर, प्रगती वैद्य, सुनील शरजारे यांनी बसमधील प्रवाशांची अंगझडती व सामानाची तपासणी केली. मात्र चोरी गेलेला मुद्देमाल मिळाला नाही.
 

Web Title: The theft of jewelery from the purse of a woman who was returning to the village from treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.