वाघाने फोडली डरकाळी अन् शेतकऱ्यांनी ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 05:41 PM2023-02-16T17:41:19+5:302023-02-16T17:41:33+5:30
सुकळी शिवारात वाघ आला रे वाघ आला
तुमसर (भंडारा) : तालुक्यातील सुकळी (देव्हाडी) शिवारात उन्हाळी हंगामातील धानपिकाला बुधवारी सकाळी शेतकरी पाणी देत होते. अचानक १०.३० वाजताच्या सुमारास नाल्यातून वाघाची डरकाळी ऐकायला आली. शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली. वाघ आला रे वाघ आला म्हणत गावाकडे धूम ठोकली. गावात माहिती होताच गावकऱ्यांनी वाघ बघण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाचे पथकही दाखल झाले.
सुकळी येथील शेतकरी जसवंत सहारे नेहमीप्रमाणे धानाला पाणी देण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. आसपासच्या शेतातही शेतकरी काम करीत होते. अचानक सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नाल्यातून वाघाची डरकाळी ऐकायला आली. क्षणभर काय झाले हे कळलेच नाही. मात्र, आसपास वाघ असावा असा अंदाज आला. त्यावेळी वाघ आला रे वाघ आला म्हणत परिसरातील शेतकऱ्यांनी गावाकडे धूम ठोकली. गावकऱ्यांना माहिती दिली. वाघ असल्याची माहिती पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. नाल्याशेजारी वाघ बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. नाल्यातील झुडुपात वाघ बसून असल्याचे दिसले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले यांच्या नेतृत्वात एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता नाल्यातील झुडुपात वाघ बसून असल्याचे त्यांनाही दिसून आले. नाल्याजवळ मोठी गर्दी झाल्याने वाघाला जेरबंद कसे करावे असा प्रश्न वनविभागाच्या पथकापुढे निर्माण झाला. काही वेळ वाघाचे दर्शन झाल्यानंतर दुपारनंतर मात्र वाघ दिसेनासा झाला. मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते.
सुकळी परिसरात पहिल्यांदाच वाघाचा संचार
तुमसर तालुक्यात वाघाचे दर्शन नित्याचेच झाले आहे. परंतु सुकळी शिवारात अद्यापपर्यंत वाघाचा संचार दिसून आला नव्हता. हा परिसर सुरक्षित मानला जातो. कोणतेही जंगल नाही की झुडपी वनस्पती नाही. मात्र, बुधवारी सकाळी १०.३० वाजता वाघाने डरकाळी फोडली आणि याही भागात वाघाचा संचार असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काही अंतरावरून वैनगंगा नदी वाहत असून वाघ त्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.