वाघाने एक महिन्यात केली पाच जणांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 12:04 AM2022-10-08T00:04:04+5:302022-10-08T00:04:54+5:30
गत वर्षी १६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील देवीदास गायकवाड या व्यक्तीची पहिली शिकार केली या वाघाने केली होती. तेव्हापासून आतापर्यंत १३ जणांचा बळी घेतला. त्यात जून महिन्यात तब्बल ५ व्यक्तींची शिकार केली असून, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील तीन व्यक्तींचा समावेश आहे.
दयाल भोवते
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तीन जिल्ह्यांत १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाने एकाच जून महिन्यात पाचजणांची शिकार केल्याची माहिती पुढे आली आहे. चंद्रपूर दोन आणि गडचिरोली जिल्ह्यात तिघांना ठार मारले होते. सध्या वळसा परिसरात वाघाचा संचार असून, त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे शीघ्र कृती दल आणि शार्प शूटर जंगलात तळ ठोकून आहेत.
चिमूर टायगर अर्थात सीटी-१ या वाघाने मागील दहा महिन्यांत भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांत दहशात निर्माण केली आहे. गत वर्षी १६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील देवीदास गायकवाड या व्यक्तीची पहिली शिकार केली या वाघाने केली होती. तेव्हापासून आतापर्यंत १३ जणांचा बळी घेतला. त्यात जून महिन्यात तब्बल ५ व्यक्तींची शिकार केली असून, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील तीन व्यक्तींचा समावेश आहे.
वाघाला पकडण्यासाठी तीनही जिल्ह्यातील वन कर्मचारी सज्ज असून, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा जंगलात त्याचा सध्या संचार असल्याची माहिती आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जंगलात ६१ ट्रॅप कॅमेऱ्यासह वाघाच्या मार्गावर पाच मचानी उभारल्या आहेत. तेथे खडा पहारा सुरू आहे. मात्र, हा वाघ सर्वांना हुलकावणी देत आहे.
या व्यक्तींचा घेतला बळी
- देवीदास गायकवाड (रा. चिमूर), प्रमोद चौधरी (रा. दहेगाव, लाखांदूर), जयपाल कुंभरे (रा. इंदोरा, लाखांदूर), मधुकर मेश्राम (रा. कुरुड, वडसा), अजित नाकाडे (रा. शिवराजपूर, वडसा), राजेंद्र कांबळी (रा. हळदा, ब्रह्मपुरी), देवीदास कांबळी (रा. हळदा, ब्रह्मपुरी), वासुदेव मेश्राम (रा. इंजेवारी, आरमोरी), किशोर मामीडवार (रा. पोर्ला, आरमोरी), सागर वाघरे (रा. बोरी, आरमोरी), प्रेमलाल प्रधान (रा. उसेगाव, वडसा), विनय मंडल (रा. इंदोरा, लाखांदूर) आणि तेजराम कार (रा. कन्हाळगाव, लाखांदूर).