दोघांचे जीव घेणारा पवनीतील वाघ अखेर झाला बंदिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:16 PM2023-06-29T15:16:43+5:302023-06-29T15:24:30+5:30
गावकरी संतप्त : एकाच आठवड्यात दोघांचा बळी, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता
पवनी (भंडारा) : एकाच आठवड्यात दोन गावकऱ्यांवर हल्ला करून बळी घेणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे संतापलेले गावकरी बुधवारी रस्त्यावर उतरले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. अखेर सायंकाळी उशिरा वाघाला बेशुद्ध करून पकडल्यावर हा तणाव निवळला आहे. असे असले तरी वाघाची दहशत मात्र गावकऱ्यांमध्ये कायमच आहे.
मागील आठवड्यात घडलेल्या घटनेमध्ये पवनी तालुक्यातील गुडेगाव येथील राखीव वनक्षेत्र क्रमांक २३८ जवळ असलेल्या छगन सावरबांधे यांच्या शेताजवळ बकऱ्या चारायला गेलेल्या सुधाकर सीताराम कांबळे (४२ वर्षे) या व्यक्तीचा दुपारी वाघाच्या हल्लात मृत्यू झाला होता. शेताच्या धुऱ्यावर नाल्यालगत बकऱ्या चारणाऱ्या सुधाकरवर वाघाने मागून हल्ला करून फरफटत नेले होते. नंतर त्याचा मृतदेह जंगलात दिसला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वाघाला पकडण्याची मागणी करून आंदोलन केले होते. मात्र निव्वळ आश्वासन देऊन वन विभागाने वेळ मारून नेली.
वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार, गावकऱ्यांच्या हल्ल्यात वन अधिकारी जखमी
या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा सात दिवसातच या घटनेची पुनरावृत्ती झाली. खातखेडा गावातील ईश्वर सोमा मोटघरे (५८) या शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर वाघाने अर्धवट खाल्लेले प्रेत दिसले.
दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य
पवनी तालुक्यात एकाच आठवड्याच्या अंतराने घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य आहे. घटनेनंतर गावकरी संतप्त झाले होते. आंदोलनाचा इशारा देऊनही दखल न घेतल्याने बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याचा प्रसंग उद्भवला. वेळीच दखल घेतली असती, तर जीव वाचला असता, गावकऱ्यांचा क्षोभही टाळता आला असता.
उपवनसंरक्षक गवई यांचे लेखी आश्वासन
तणावाच्या घटनेनंतर उपवन संरक्षक गवई यांनी गावात पोहोचून गावकऱ्यांशी चर्चा केली. सुरक्षेचे आश्वासन दिले. लगतच्या जंगलातील झुडपे मजुरांचे साहाय्याने पंधरा दिवसात काढण्यात येतील. वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत वनविभागाचे कर्मचारी गावाचे परिसरात गस्त करतील. मृताच्या कुटुंबीयांना देय असलेले संपूर्ण लाभ एक महिन्यात देण्यात येतील. तसेच, गावालगत असलेल्या तलावाला जाळीचे कुंपण करण्याचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजना किंवा राज्य योजनेतून पंधरा दिवसांत अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
मृताच्या कुटुंबीयांना मदत
मृत ईश्वर मोटघरे यांच्या कुटुंबीयांना वन विभागाने तातडीची मदत केली. तीस हजार रुपये नगदी व नऊ लाख सत्तर हजार रुपयांचा धनादेश कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.