बछड्यासह वाघीण गेली जंगलात अन् सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By युवराज गोमास | Published: February 10, 2023 06:15 PM2023-02-10T18:15:59+5:302023-02-10T18:16:33+5:30
खडकी नाल्यात ठिय्या : सुरक्षेसाठी वनविभागाची १२ तास मोहीम
भंडारा : मोहाडी तालुक्यातील खडकी - डोंगरदेव नाल्यात गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक वाघीण व बछडा दिसून आले. वाऱ्याच्या वेगाने वार्ता परिसरात पोहोचली. नागरिकांच्या गोंगाटाने घाबरलेल्या दोन्ही वाघांनी नाल्यात ठिय्या मांडला. कोका वन्यजीव अभयारण्य व तुमसर वनाधिकारी तळ ठोकून होते. वाघांना जंगलात हुसकावण्याच्या मोहिमेला गती आली. अखेर १२ तासांच्या मोहिमेनंतर दोन्ही वाघांनी जंगलाचे दिशेने पलायन केल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
कोका वन्यजीव अभयारण्य वन्यजीवांनी समृद्ध आहे. तृणभक्षक प्राण्यांसोबत वाघ, बिबट आदी हिंस्त्र प्राण्याची संख्याही मोठी आहे. शिकारीच्या शोधात वाघ व बिबट्यांचा मुक्त संचार असतो. सध्या रब्बी हंगामात हिरवेगार पीक डौलाने उभे आहेत. या स्वादिष्ट पिकांवर ताव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात तृणभक्षक प्राणी बफर झोन परिसरात वावरताना दिसून येतात. त्यांच्या पाठोपाठ वाघ व बिबट्यांचा संचारसुद्धा दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, भीतीचे वातावरणही असते.
गुरुवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास एक वाघीण बछडा शिकारीच्या शोधात जंगलाबाहेर आले. खडकी ते डोंगरदेवदरम्यानच्या बफर झोनमधील नाल्यात दिसून आले. खडकी ते डोंगरदेव रस्ता ओलांडताना एका चारचाकी वाहनचालकासही दिसून आले. वाघ असल्याची माहिती परिसरात पोहोचली. भीतीने शेतकरी गावाच्या दिशेने निघाले. परिसरात एकच गर्दी दिसून आली. नागरिकांना हटविण्यासाठी करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड चमूसह घटनास्थळी दाखल झाले. शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वाघ व बछड्याला जंगलाचे दिशेने हुसकावण्यासाठी नानाविध प्रयत्न झाले. फटाकेही फोडण्यात आले. परंतु घाबरलेल्या स्थितीत दडी मारून बसलेली वाघीण व बछडा नाल्यातून बाहेर निघेना. अखेर रात्री वातावरण शांत होताच १० वाजेदरम्यान अंधारात दोन्ही वाघांनी जंगलाच्या दिशेने पलायन केले.
सुरक्षेसाठी वनाधिकाऱ्यांची धडपड
वाघीण व बछडा सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेत कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. एम. माकडे, तुमसर प्रादेशिकचे वनपरिक्षेत्राधिकारी छगन राहांगडाले, शीघ्र कृती दलाचे डेव्हिड मेश्राम, क्षेत्र सहायक धनवीज, एम. वाय शेख, गजभिये, पालोराचे बीट रक्षक मोहन हाके, उमराव कोकुडे, एन. एस. कळंबे, राकेश चौरे, बी. बी. निश्चित, क्रिष्णा मस्के, दिनेश शेंडे आदी कर्मचाऱ्यांचा ताफा खडकी शेतशिवारात तळ ठोकून होता.