ट्रकची एसटीला कट, चालकाच्या सावधगिरीने ३५ प्रवासी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:02 PM2023-09-06T13:02:19+5:302023-09-06T13:02:41+5:30

एसटी रस्त्यावरून खाली उतरली : वरठी भंडारा बायपास रेल्वे पुलावरील घटना

The truck hit the ST bus, 35 passengers narrowly escaped with the caution of the driver | ट्रकची एसटीला कट, चालकाच्या सावधगिरीने ३५ प्रवासी थोडक्यात बचावले

ट्रकची एसटीला कट, चालकाच्या सावधगिरीने ३५ प्रवासी थोडक्यात बचावले

googlenewsNext

वरठी (भंडारा) : विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने एसटीला कट मारल्याने बसचालकाचा ताबा सुटला. बस रस्त्याखाली उतरली; पण बसचालकाने पुन्हा वेळेवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने थोडक्यात निभावले. दोन फूट बस समोर सरकली असती तर बस पुलावरून खाली खोसळली असती. नशीब बलवत्तर म्हणून ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.

ही दुर्घटना मंगळवारला दुपारी तीन वाजताच्या सुमारास वरठी भंडारा बायपास रेल्वे पुलावर घडली. बस क्रमांक (एमएच १२ इ एफ ६८५५) कान्द्री येथून भंडाराला जात होती. वरठी बायपास रस्त्यावरील रेल्वे पुलावरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार कट मारली. कट मारल्याने बसचालकाचा ताबा सुटला व अपघात टाळण्यासाठी बस रस्त्याच्या खाली उतरली. पुलावरून खाली उतरताच बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला अडकली. यामुळे मोठा अपघात टळला. दोन फूट बस समोर गेली असती तर बस उलटली असती. यामुळे मोठी जीवितहानी टळली.

बसमध्ये ३५ प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. थोडक्यात अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व पोलिस हवालदार शैलेश आगाशे घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

रस्ता अरुंद, वाहने मात्र भरधाव

भंडारा ते तुमसर या महामार्ग विस्तारीकरणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. परिणामी, भंडारा ते वरठी मार्गही सद्यस्थितीत अरुंद आहे. रस्ता अरुंद असला तरी वाहने भरधाव वेगाने धावत असतात. ट्रकचालकांची बेबंदशाही येथे दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे भंडारा ते वरठी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. दोन दिवसांपूर्वीच खड्डे डागडुजीला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, रस्त्याच्या विस्तारीकरणाबाबत हालचाल होताना दिसत नाही.

Web Title: The truck hit the ST bus, 35 passengers narrowly escaped with the caution of the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.