लग्न समारंभाला आलेल्या युवकांची दुचाकी खड्ड्यात आदळली, तिघेही गंभीर
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: May 4, 2024 12:24 AM2024-05-04T00:24:57+5:302024-05-04T00:25:17+5:30
ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४, अर्जुनी मोर), लकी भारत नाकाडे (२०) व अर्जुन दीपक धोटे (२२) दोन्ही रा ब्रम्हपुरी असे अपघातातील गंभीर जखमीची नावे आहेत.
भंडारा : लाखांदूर येथे सायंकाळच्या सुमारास नातालगाकडे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेले ३ मित्र दुचाकीसह खड्ड्यात पडले. यामुळे तिघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४, अर्जुनी मोर), लकी भारत नाकाडे (२०) व अर्जुन दीपक धोटे (२२) दोन्ही रा ब्रम्हपुरी असे अपघातातील गंभीर जखमीची नावे आहेत.
सविस्तर असे, स्थानिक लाखांदूर येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या पटांगणात एका स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत समारोहासाठी तिघेही युवक ब्रह्मपुरीवरून लाखांदूर येथे आले होते. स्वागत समारोहाला उशिरा असल्याने तिघेही दुचाकीने काही वेळ घालवण्यासाठी पिंपळगाव मार्गावर असलेल्या पटांगणावर गेले होते. मैदानावरून भरधाव वेगाने दुचाकी चालवत येत असताना वळणावर नियंत्रण सुटले व एका खड्ड्यात दुचाकी आदळली. यात तिघेही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ दत्तात्रय ठाकरे, डॉ अर्चना मेश्राम व अन्य वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. मात्र जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.