प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक शिरले रानडुक्कर अन् सगळ्यांचाच उडाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 02:15 PM2022-07-09T14:15:14+5:302022-07-09T14:19:47+5:30
दोन तासांनंतर वन कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद
भंडारा : अचानक शिरलेल्या एका रानडुकराने प्राथमिक आरोग्य केंद्रात धुमाकूळ घातला. कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण संचारले. वेळीच भंडारा जलद बचाव दलाच्या पथकाने धाव घेत मोठ्या शिताफीने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला जेरबंद केले. ही घटना भंडारा तालुक्यातील मोहदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. हा थरार पाहण्यासाठी गावातील सुमारे ५०० लोकांचा जमाव गोळा झाला होता.
मोहदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी रात्री अचानक रानडुकर शिरले. बाहेर निघण्यासाठी त्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण होते. गावकऱ्यांनी रानडुकराला हुसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु रानडुकर निघता निघेना. काय करावे सुचेनासे होताच वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर यांना कळविण्यात आले. माहिती मिळताच भंडारा येथील जलद बचाव दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनास्थळी मोठा जमाव झाल्याने बचाव पथकाला पकडताना अडचणी येत होत्या. अखेर जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांच्या मदतीने बचावपथक आरोग्य केंद्रात शिरले. मात्र रानडुक्कर सैरावैरा फिरत असल्याने त्याला पकडणे कठीण झाले होते. अखेर मोठ्या धाडसाने वनकर्मचाऱ्यांनी रानडुकरास जाळ्यात पकडले. त्याला बांधून पिंजऱ्यात डांबले आणि नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही कारवाई भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, बचाव दल पथकाचे वनकर्मचारी अनिल शेळके, सचिन कुकडे, नवनाथ नागरगोजे यांनी केली.