वारा आला अन् वीज गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 05:00 AM2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:28+5:30
देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने लहानसहान बाबीवरुनही वीजपुरवठा खंडित होत आहे. १५ दिवसांपूर्वी तर पूर्णत: ब्लॅक आऊट झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास विजेचा खेळखंडोबा बघायला मिळाला. ग्रामीण भागात तर वीज केव्हा येणार याची शाश्वती राहिली नाही. तर दुसरीकडे कृषीपंपांचा वीजपुरवठा नियमित न होणे ही समस्याही कायम आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वीज ही मूलभूत घटकांपैकी एक अनन्यसाधारण घटक आहे; परंतु देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने लहान-सहान कारणावरूनही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारा आला अन् वीज गेली असाच प्रकार गत दोन दिवसांपासून सुरू आहे. रात्री-बेरात्री विजेचा पुरवठा खंडित होत असल्याने आबालवृद्धांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्ह्यात ५ लाखांपेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत. यात घरगुती, व्यापारी कामासाठी, औद्योगिक, सार्वजनिक दिवाबत्ती, कृषी व इतर विद्युत ग्राहक मिळून विजेची मोठी खप होत आहे. गतवर्षी विजेचा दरडोई वापर ३६० किलोवॅट प्रती तासापेक्षा जास्त होता. यावर्षी यात चांगलीच वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असताना विजेची मागणीही वाढली आहे.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊसही बरसला आहे. गत आठवड्यात साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. याची पुनरावृत्ती गत दोन दिवसात पुन्हा बघायला मिळत आहे; परंतु या लहानसहान बाबींमुळे विजेचा पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येते. महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक कर्मचाऱ्यांवर कमी झाल्याने ही समस्या उद्भवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने लहानसहान बाबीवरुनही वीजपुरवठा खंडित होत आहे. १५ दिवसांपूर्वी तर पूर्णत: ब्लॅक आऊट झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास विजेचा खेळखंडोबा बघायला मिळाला. ग्रामीण भागात तर वीज केव्हा येणार याची शाश्वती राहिली नाही. तर दुसरीकडे कृषीपंपांचा वीजपुरवठा नियमित न होणे ही समस्याही कायम आहे. जिल्ह्यात २ लाखांपेक्षा जास्त घरगुती वीज जोडणी आहे. तर १९ हजार पेक्षा जास्त व्यापारी कामासाठी वीज जोडणी देण्यात आली आहे. ३६ हजार ५०० च्या वर औद्योगिक जोडणी देण्यात आली असून २ लाखांपेक्षा जास्त कृषीपंपधारक आहेत. विजेची मागणी अधिक असून त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने अवेळी होणारे भारनियमन वेगळेच आहे.
‘लो व्होल्टेज’ची समस्या कायम
- वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर कुठे कोणता बिघाड झाला असेल याची माहिती कंपनीला असते. मात्र विद्युत गेल्यावर व लगेच वीज आली तरी लो व्होल्टेजचा सामना करावा लागत असतो. यात विद्युत उपकरणे निकामी होण्याची समस्याही बळावली आहे. शनिवारी याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अनेक वाॅर्डात एक फेस नसल्याने त्याचा परिणाम अन्य बाबींवर जाणवला. लो व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून आले.
ग्राहक विद्युत मीटरच्या प्रतीक्षेत
- वीज कंपनीत विद्युत मीटरचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर रस्त्यावर अतिक्रमणधारकांना विद्युत मीटर कसे काय दिले जाते असाही प्रश्न उपस्थित होतो. नियमात त्यांनाही मीटर देणे योग्य बाब असली तरी अन्य ग्राहक मात्र प्रतीक्षेत आहेत.