तरुण डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यातच केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:52 PM2024-10-22T12:52:38+5:302024-10-22T12:53:25+5:30
Bhandara : केबिनमध्ये पंख्याला घेतला गळफास; भोजापुरातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील भोजापूर येथे एका तरुण डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. हर्षल पन्नालाल शेंडे (२९) असे या डॉक्टरचे नाव असून, नंदनवन आयुष क्लिनिक या नावाने तो भोजपूर येथे दवाखाना चालवत होता.
डॉक्टर हर्षल पन्नालाल शेंडे हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील होता. दोन वर्षांचा असताना वडिलाचे छत्र हरवले. त्यामुळे त्याची आई माहेरी भोजापूर येथे आली. त्यामुळे मामा उमेश बांते यांनी सांभाळ केला. आई भोजापूर येथे अंगणवाडी शिक्षिका आहे. त्याचे बीएएमएसपर्यंत शिक्षण झाले होते. गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून गावीच नंदनवन आयुष क्लिनिक नावाने तो दवाखाना चालवीत होता. काही महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयमध्येही वैद्यकीय सेवा देत होता.
मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
पुण्यावरून प्रशिक्षण आटोपून हर्षद रविवारी गावी आला. त्यानंतर सोमवारी सकाळी दवाखाना उघडला. मात्र, दुपारपर्यंत न आल्याने घरच्यांना दवाखान्यात जाऊन बघितले असता शटर आतून बंद होते. शटर उघडून बघितले असता तर केबिनमध्ये असलेल्या पंख्याला दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
आईचा आधार हरविला
डॉ. हर्षद अविवाहित होता. त्याच्या पाठीशी आईशिवाय कुणीही नव्हते. त्याच्या आत्महत्येमुळे आता आईचा एकुलता एक आधार हरविला आहे.