मांगली येथे १ लाख ७१ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:31+5:302021-03-18T04:35:31+5:30
पालांदूर : बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, असा १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना ...
पालांदूर : बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, असा १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना लाखनी तालुक्यातील मांगली बांध येथे घडली. याप्रकरणी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
मांगली बांध येथील दामोदर नामदेव घाटबांधे हे १४ मार्च रोजी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून मागील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याच्या चार ग्रॅम वजनाच्या डोर, चार ग्रॅम वजनाची सोन्याची जीवती, सोन्याचे तीन ग्रॅमचे मणी, सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाॅप्स, तीन ग्रॅमची सोच्याची नथ आणि रोख ७५ हजार रुपये, असा १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ते मंगळवारी गावी परत आले. तेव्हा घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांनी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, सहायक फौजदार प्रकाश तलमले, शिपाई नावेद पठाण यांनी मांगली गाठून तपास केला. या चोरीने मांगली गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.