माहेरी बाळंतपणाला आलेल्या महिलेच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:24+5:30
तीन तोळ्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख २० हजार रुपये, एक तोळा वजनाचे लहान मंगळसूत्र किंमत ४० हजार रुपये, सोन्याचे झुमके, सोन्याचे तीन तोळ्याचे दोन कंगण किंमत १ लाख २० हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाची बिंदिया, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, तीन ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, चांदीच्या तोरड्या, चांदीचा गुच्छा असे दागिने चोरीस गेले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वरठी : माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेचे ३ लाख ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सुभाष वाॅर्डात सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी वरठी ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
श्वेता कुलदीप पटले (३१), रा. सुखसागर, पुणे असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. पहिले बाळंतपण असल्याने श्वेता चंद्रपूर येथे आपल्या बहिणीकडे मार्च महिन्यात गेली होती. तिला तेथे तिला मुलगी झाली. त्यानंतर आराम करण्यासाठी ती माहेरी वरठी येथे मालू पिपरोदे यांच्याकडे आली होती. पुणे येथे घरी कुणीच राहणार नसल्याने तिने आपले सर्व दागिने सोबतच आणले होते. ते दागिने एका बॅगमध्ये ठेवले होते.
रविवारी रात्री त्यांचे वडील हाॅलमध्ये दार उघडे ठेवून झोपले, तर आई व श्वेता वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपी गेल्या. सोमवारी सकाळी वडिलांना जाग आली, तेव्हा बॅग घराच्या मागच्या बाजूला पडलेली दिसली. त्यांनी ही माहिती आपल्या मुलीला दिली. तिने बॅगची पाहणी केली असता चोरट्यांनी तब्बल ३ लाख ४२ हजारांचे दागिने लंपास केल्याचे लक्षात आले.
उघड्या दारातून चोरट्याने प्रवेश करून ही चोरी केली असावी, असा संशय आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील एका घरात याच रात्री चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी एका चोरट्याचा परिसरातील नागरिकांनी पाठलागही केला होता.
या घटनेची तक्रार वरठी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत.
या दागिन्यांची झाली चोरी
- तीन तोळ्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख २० हजार रुपये, एक तोळा वजनाचे लहान मंगळसूत्र किंमत ४० हजार रुपये, सोन्याचे झुमके, सोन्याचे तीन तोळ्याचे दोन कंगण किंमत १ लाख २० हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाची बिंदिया, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, तीन ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, चांदीच्या तोरड्या, चांदीचा गुच्छा असे दागिने चोरीस गेले.