किराणा दुकानात रोख दीड लाखाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:28+5:302021-03-04T05:07:28+5:30
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज. येथील किराणा दुकानात चोरी होऊन चोरट्यांनी रोख दीड लाख रुपये लंपास केल्याची ...
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज. येथील किराणा दुकानात चोरी होऊन चोरट्यांनी रोख दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी करडी ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
चंद्रप्रकाश कवडूजी चौरागडे यांचे मुंढरी येथील बाजार चौकात किराणा व पशुखाद्याचे दुकान आहे. मंगळवारी रात्री त्यांनी आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद केले. बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता आत प्रवेश करताच चोरी झाल्याचा संशय आला. लगेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश वाजे, पोलीस हवालदार राकेशसिंग सोलंकी, महेश पटले घटनास्थळी दाखल झाले. रात्रीला अज्ञात चोरट्यांनी लाकडी शिडी लावून दुकानावर चढले. कौलारू घरातून गोदामात प्रवेश केला. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. दुकानाच्या गल्ल्यांमधील रोख एक लाख ५१ हजार रुपये चोरीस गेल्याचे पुढे आले. पोलिसांनी भंडारा येथील श्वान पथक आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञाला पाचारण केले. चंद्रप्रकाश चौरागडे यांच्या तक्रारीवरून करडी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. चोरट्यांना कुणीही पाहिले नाही तसेच आजूबाजूच्या लोकांनाही कोणत्याही प्रकारचा आवाज आला नाही. चोरीच्या दिवशी रात्रीदरम्यान वर्षभरापासून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नेमक्या वेळी बंद होते. चोरट्यांनी दुकानातील किराणा साहित्याची चोरी न करता फक्त नगदी रक्कम लंपास का केली, आदी प्रश्न पोलिसांबरोबर नागरिकांतही चर्चेत आहेत.